८९६ लोकांची आरोग्य तपासणी
By Admin | Updated: February 2, 2016 01:29 IST2016-02-02T01:29:53+5:302016-02-02T01:29:53+5:30
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत स्थानिक ग्रामीण रुग्णालयात सोमवारी शिबिर आयोजित करून तज्ज्ञांकडून ८९६ लोकांची ...

८९६ लोकांची आरोग्य तपासणी
आरोग्य शिबिर : चामोर्शी रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देऊ-होळी
चामोर्शी : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत स्थानिक ग्रामीण रुग्णालयात सोमवारी शिबिर आयोजित करून तज्ज्ञांकडून ८९६ लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. ग्रामीण भागातील रुग्णांना तत्काळ आरोग्य सेवा देण्यास तत्पर राहावे, असे आवाहन करीत चामोर्शी ग्रामीण रुग्णालया उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन शिबिरात आ. डॉ. देवराव होळी यांनी दिले.
शिबिराचे उद्घाटन आ. डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते करण्यात आले. सहउद्घाटक म्हणून पं. स. सभापती शशिकला चिळंगे, अध्यक्षस्थानी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रूडे, प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार यू. जी. वैद्य, आरोग्य सेवा मंडळ नागपूरचे सहाय्यक संचालक डॉ. आर. एस. फारूकी, वैद्यकीय अधीक्षक आय. जी. नागदेवते, नगर पंचायतीचे उपाध्यक्ष राहुल नैताम, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन हेमके, नायब तहसीलदार देवेंद्र दहिकर, बंडू चिळंगे, रमेश अधिकारी उपस्थित होते. शिबिरात ६१५ सर्वसामान्य लोकांची तपासणी करण्यात आली. १९४ क्षयरोग व मधुमेह आजाराची, ६७ सिकलसेल, २० एचआयव्ही एड्स असे एकूण ८९६ लोकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. रिक्त असलेली पदे २९ फेब्रुवारीपर्यंत भरले जातील, १० फेब्रुवारीपर्यंत महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून मोफत नेत्र तपासणी व इतर औषधोपचार केले जातील, रुग्णालयातील खाटांची संख्या वाढविले जाईल, असे आश्वासन आ. डॉ. देवराव होळी यांनी यावेळी दिले. संचालन नागेश मादेशी तर आभार विनायक कुनघाडकर यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)