७६८ बेरोजगारांना व्यवसायाचे प्रशिक्षण
By Admin | Updated: February 6, 2017 01:26 IST2017-02-06T01:26:37+5:302017-02-06T01:26:37+5:30
स्टार स्वयंरोजगार संस्था गडचिरोलीच्या वतीने वर्षभरात जिल्हाभरातील ७६८ युवकांना प्रशिक्षण दिले आहे.

७६८ बेरोजगारांना व्यवसायाचे प्रशिक्षण
आरसेटीचा उपक्रम : अनेकांना मिळाला रोजगार
गडचिरोली : स्टार स्वयंरोजगार संस्था गडचिरोलीच्या वतीने वर्षभरात जिल्हाभरातील ७६८ युवकांना प्रशिक्षण दिले आहे. विशेष म्हणजे, यामध्ये रोहयो मजुरांचा समावेश आहे.
केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्या वतीने आरसेटी (रूरल सेल्फ एम्पलायमेंट ट्रेनिंग इंस्टिट्युट) चालविली जाते. गडचिरोली जिल्ह्यात आरसेटीचे काम लिड बँक म्हणून बँक आॅफ इंडियाकडे सोपविण्यात आले आहे. गडचिरोली जिल्ह्यात उद्योग नसल्याने रोजगाराची गंभीर समस्या आहे. अनेक सुशिक्षीत युवकांना बेरोजगारीचा सामना करावा लागतो. स्वयंरोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध असल्या तरी स्वंयरोजगार करण्याचे कौशल्य युवकांजवळ नाही. त्यामुळेही बेरोजगारीत अधिकच भर पडत होती. आरसेटीच्या मार्फतीने जिल्ह्यातील युवकांना स्वंयरोजगाराचे प्रशिक्षण दिले जात आहे. विशेष म्हणजे, गडचिरोली जिल्ह्यात ज्या व्यवसायाला प्राधान्य आहे. अशा व्यवसायाचे प्रशिक्षण दिले जात असल्याने युवक वर्गही प्रशिक्षण करण्यास तयार होत आहेत. वर्षभरात सुमारे ७६८ युवकांना व्यवसायाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. यापैकी बहुतांश युवकांनी स्वत:चा व्यवसाय सुरू केला आहे.
ज्या युवकांना प्रशिक्षण दिले जाते, त्या युवकांना स्वंयरोजगार करता यावा, यासाठी बँकेच्या वतीने कर्जही उपलब्ध करून दिल्या जाते. त्यामुळे इतर संस्थांच्या तुलनेत आरसेटीच्या माध्यमातून प्रशिक्षण घेण्याकडे युवकांचा ओढा वाढला आहे. विशेष म्हणजे, आरसेटीच्या मार्फतीने प्रशिक्षणासाठी प्रशिक्षक म्हणून ज्यांची नेमणूक केली जाते, ते प्रशिक्षक प्रत्यक्ष स्वत:चा व्यवसाय सुरू केलेले राहतात. त्यामुळे प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकीज्ञान उपलब्ध न होता प्रत्यक्ष प्रात्यक्षिक मिळते. प्रशिक्षक स्वत:च्या व्यवसायातील अनुभव विद्यार्थ्यांना देत असल्याने व्यवसायाचे कौशल्य प्राप्त होण्याबरोबरच प्रत्यक्ष व्यवसाय करण्यातील अडचणी त्या कशा सोडवाव्या याबाबतचेही ज्ञान विद्यार्थ्यांना उपलब्ध होते. रोहयो मजुरांना स्वत:चा व्यवसाय करता यावा, यासाठी मागील वर्षीपासून केंद्र शासनाने रोहयो मजुरांना प्रशिक्षण देताना शिक्षणाची अट काढून टाकली आहे. त्यामुळे रोहयो मजुरांना प्रशिक्षणाची संधी वर्षभरात सुमारे १७८ रोहयो मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित रोहयो मजुरही व्यावसायिक बनण्यास मदत होत आहे. अकुशल मजुरांची संख्या कमी करणे हा या उपक्रमामधील महत्त्वाचा उद्देश साध्य झाला आहे. (नगर प्रतिनिधी)
दिले जाणारे प्रशिक्षण
आरसेटीच्या माध्यमातून मशरूम लागवड, ब्युटी पार्लर, ड्रेस डिझाईनिंग, कुकुटपालन, बकरीपालन, फोटोग्राफी, व्हिडीओग्रॉफी वाहन चालक आदी प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते. या सर्व व्यवसायांना गडचिरोली जिल्ह्यात फार मोठी रोजगाराची संधी उपलब्ध आहे.
आरसेटीच्या मार्फतीने ज्या व्यवसायाचे प्रशिक्षण दिले जाते. सदर व्यवसाय अत्यंत कमी भांडवलात सुरू करता येतात. त्यामुळे बेरोजगार युवकांचा सदर प्रशिक्षण घेण्याकडे ओढा आहे. मशरूम लागवड हा अत्यंत कमी खर्चात सुरू करता येणारा उद्योग आहे. त्यामुळे सदर प्रशिक्षण घेणाऱ्यांची संख्या अधिक आहे.