72.37 per cent graduates turned out to vote | 72.37 टक्के पदवीधर मतदानासाठी सरसावले

72.37 टक्के पदवीधर मतदानासाठी सरसावले

ठळक मुद्दे२०१४ च्या तुलनेत दुप्पट मतदान : गडचिराेली, देसाईगंज व चामाेर्शीत मतदारांच्या रांगा

  लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : नागपूर पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी मंगळवारी ९००८ पदवीधरांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान केलेल्यांमध्ये ६७५१ पुरूष व २२५७ महिला मतदारांचा समावेश आहे. जिल्ह्यातील २१ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रीया पार पडली. मतमाेजणी ३ डिसेंबर राेजी हाेणार आहे. विशेष म्हणजे, २०१४ च्या निवडणुकीत केवळ ३५.८६ टक्के मतदान झाले हाेते. त्या तुलनेत यावर्षी  दुप्पट, म्हणजे ७२.३७ टक्के मतदान झाले.  
 गडचिराेली तालुक्यात सर्वाधिक ३ हजार ३२५ मतदार हाेते.  त्यामुळे तहसील कार्यालयात चार मतदान केंद्र ठेवण्यात आले हाेते. सकाळी ८ वाजेपासून मतदानाला सुरूवात झाली. तहसील कार्यालयाच्या परिसरात मंडप टाकून मतदारांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली हाेती. मात्र बहुतांश मतदार दरवाजाच्या अगदी समाेर रांग लावून उभे असल्याने खुर्चीवर बसलेल्यांना तहसील कार्यालयाच्या मुख्य इमारतीत प्रवेश मिळत नव्हता. मतदान केंद्रासमाेरील रांग  नियंत्रीत करण्यासाठी पाेलीस बंदाेबस्त लावला हाेता.
दुपारी ३ पर्यंत मतदानाची वेळ असल्यामुळे १ वाजतानंतर माेठ्या प्रमाणात गर्दी झाली. त्यामुळे काही मतदारांना दाेन ते तीन तास प्रतीक्षा केल्यानंतर हक्क बजावता आला. ३ वाजता तहसील कार्यालयाचा मुख्य दरवाजा बंद करून आतमध्ये असलेल्या मतदारांना ३ वाजतानंतरही मतदानाची संधी देण्यात आली. सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान चालले. 
भाजप, काॅंग्रेस व इतर पक्षांनी तहसील कार्यालयापासून काही अंतरावर बुथ उभारले हाेते. या ठिकाणी मतदाराचा अनुक्रमांक, मतदान केंद्र क्रमांक शाेधून दिला जात हाेता. त्याचबराेबर आपल्याच उमेदवाराला मतदान करण्याची विनंतीसुद्धा केली जात हाेती. मतदान केंद्र परिसरात काेणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी या परिसरातील सर्व पानठेले, चहा टपऱ्या बंद ठेवण्यात आल्या हाेत्या. ग्रामीण भागातूनही शेकडाे मतदार गडचिराेली येथे मतदानासाठी दाखल झाले. मतदान केंद्र परिसरात माेठ्या प्रमाणात दुचाकी व चारचाकी वाहने हाेती.
गडचिराेली : तालुक्यात सर्वाधिक ३३३५ मतदार हाेते. त्यामुळे येथील तहसील कार्यालयात पाच मतदान केंद्र ठेवण्यात आले हाेते. २३०३ मतदारांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी ६९.०५ टक्के एवढी आहे. 
एटापल्ली : येथील तहसील कार्यालयात मतदान केंद्र हाेते. तालुक्यात एकूण ३९२ मतदार आहेत. त्यापैकी २५० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये १९८ पुरूष व ५२ महिला मतदारांचा समावेश आहे. एकूण ६३.७७ टक्के मतदान झाले. निवडणूक अधिकारी म्हणून तहसीलदार अजयकुमार नष्ट हाेते. 
अहेरी : तालुक्यात एकूण ८४० मतदार हाेते. त्यापैकी ६४९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. अहेरी व आलापल्ली या दाेन ठिकाणी मतदान केंद्र हाेती. अहेरी मतदान केंद्रावर ४३६ मतदारांपैकी ३३८ मतदारांनी मतदान केले. याची टक्केवारी ७७.५२ टक्के आहे. आलापल्ली येथील मतदान केंद्रावर ४०४ मतदारांपैकी ३११ मतदारांनी मतदान केले. याची टक्केवारी ७६.९८ टक्के एवढी आहे. 
सिराेंचा : येथील मतदान केंद्रावर एकूण ३५० मतदार हाेते. त्यापैकी २८८ मतदारांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी ६७.६० टक्के एवढी आहे. २४९ पुरूष व ३९ महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. 
धानाेरा : येथे एकूण ४२३ मतदार हाेते. त्यापैकी २२३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची टक्केवारी ७६.३५ टक्के एवढी आहे. मतदान करणाऱ्यांमध्ये २४५ पुरूष व ७८ महिला मतदारांचा समावेश आहे. 
चामाेर्शी : येथे एकूण १७१८ मतदार हाेते. तहसील कार्यालयात दाेन मतदान केंद्र ठेवण्यात आली हाेती.  ११६८ मतदारांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी ६७.९९ टक्के एवढी आहे. २४९ क्रमांकाच्या मतदान केंद्रावर केंद्राध्यक्ष म्हणून तहसीलदार आकाश अवथरे व २५० क्रमांकाच्या मतदान केंद्रावर केंद्राध्यक्ष म्हणून दिलीप दुधबळे यांनी काम पाहिले. 
देसाईगंज : तालुक्यातील एकूण १४०९ मतदारांपैकी ११०० मतदारांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी ७८.०६ टक्के एवढी आहे. देसाईगंजात दाेन मतदान केंद्रावर मतदान पार पडले. 
आरमाेरी : तालुक्यात एकूण १६८१ मतदारांपैकी १२४६ मतदारांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी ७४.१२ टक्के एवढी आहे. मतदान केंद्र परिसरात चाेख पाेलीस बंदाेबस्त ठेवण्यात आला हाेता. 
कुरखेडा : येथे एकूण ११९५ मतदार हाेते. त्यापैकी ८७९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ७३.५५ टक्के मतदान झाले. 
काेरची : तालुक्यात एकूण ४८३ मतदार हाेते. तहसील कार्यालयात एकच मतदान केंद्र हाेता. ३३५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये २५५ पुरूष मतदार व ८० महिला मतदारांचा समावेश आहे. मतदानाची टक्केवारी ७३.९५ टक्के एवढी आहे. 
भामरागड : तालुक्यात एकूण १३५ मतदार आहेत. त्यापैकी १८ महिला मतदार व ९० पुरूष मतदार अशा एकूण १०८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. बाहेरून येणाऱ्या वाहनांची तपासणी केल्यानंतरच प्रवेश दिला जात हाेता. 
मुलचेरा : तालुक्यात एकूण ४४१ मतदार हाेते. त्यापैकी ३५८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. काेराेनाच्या सावटातही मतदार मतदानासाठी बाहेर निघले. 

एसडीओ व मतदारांमध्ये बाचाबाची 
दुपारी १ वाजतानंतर मतदारांची माेठ्या प्रमाणात गर्दी उसळली हाेती. तहसील कार्यालयाच्या अगदी समाेरच्या दरवाजावर मतदारांच्या रांगा हाेत्या. पाेलिसांच्या आदेशाने मतदार केंद्र परिसरात जात हाेते. दुपारी २.३० वाजताच्या सुमारास गडचिराेलीचे उपविभागीय अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी आशिष येरेकर मतदान केंद्रावर दाखल झाले. त्यांनी दरवाजासमाेरील गर्दी हटवून सर्व मतदारांना खुर्च्यांवर बसण्यास सांगितले. यावरून मतदार व एसडीओ यांच्यामध्ये शाब्दीक चकमक उडाली. पण परिस्थिती हाताबाहेर गेली नाही.

एटापल्ली व भामरागडच्या मतपेट्या हेलिकाॅप्टरने रवाना
एटापल्ली व भामरागड हे नक्षलदृष्ट्या अतिशय संवेदनशील तालुके आहेत. मतदानादरम्यान काेणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी दाेन्ही ठिकाणी माेठ्या प्रमाणात पाेलीस बंदाेबस्त ठेवण्यात आला हाेता. साेमवारी दाेन्ही ठिकाणी मतपेट्या हेलिकाॅप्टरने पाेहाेचवून दिल्या. मंगळवारी मतदान पार पडल्यानंतर मतपेट्या हेलिकाॅप्टरनेच रवाना करण्यात आल्या. 

जिल्ह्यातील पदवीधर मतदारांची नाेंदणी २०१४ च्या संख्येएवढीच नाेंदविली गेली. मात्र मतदानाची टक्केवारी वाढली आहे. जिल्ह्यातील प्रशासनाने उत्तमप्रकारे मतदानाची प्रक्रीया पार पडली. काेराेनाचा संसर्ग असतानाही मतदार मतदानासाठी बाहेर पडले. तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालनसुद्धा केले. ही समाधानाची बाब आहे. 
- दीपक सिंगला, जिल्हाधिकारी

 

 

Web Title: 72.37 per cent graduates turned out to vote

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.