जिल्ह्यात ७० टक्के मतदान

By Admin | Updated: October 15, 2014 23:16 IST2014-10-15T23:16:59+5:302014-10-15T23:16:59+5:30

गडचिरोली जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदार संघात बुधवारी दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान झाले. सरासरी ७० टक्के मतदान झाल्याची माहिती आहे. आरमोरी विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक

70 percent voting in the district | जिल्ह्यात ७० टक्के मतदान

जिल्ह्यात ७० टक्के मतदान

तीन ठिकाणी ईव्हीएम मशीन पडल्या बंद : दुर्गम भागात अनेक ठिकाणी ३ वाजेपूर्वीच मतदान बंद झाल्याची तक्रार
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदार संघात बुधवारी दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान झाले. सरासरी ७० टक्के मतदान झाल्याची माहिती आहे. आरमोरी विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक ७२ टक्के मतदान झाले आहे. अहेरी विधानसभा क्षेत्रात ७० तर गडचिरोली विधानसभा क्षेत्रात सर्वात कमी ६८ टक्के मतदान झाले आहे. सरासरी ७० टक्के मतदान झाले.
आज मतदानादरम्यान आरमोरी विधानसभा क्षेत्राच्या कोरची तालुक्यातील भीमपूर मतदान केंद्रावर ईव्हीएममध्ये बिघाड असल्याने १ तास उशीरा मतदान सुरू झाले. तर गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील चामोर्शी तालुक्यातील वायगाव व चंदनखेडी येथे दुपारी १ ते १.३० वाजतादरम्यान ईव्हीएम मशीन बिघाडामुळे बंद झाली. येथे अर्धा ते पाऊन तास मतदान प्रक्रिया खंडीत झाली होती. एटापल्ली तालुक्याच्या अनेक नक्षलप्रभावीत भागात दुपारी १ ते १.३० वाजताच मतदान प्रक्रिया बंद करण्यात आली होती. तर चामोर्शी तालुक्यातील माडे मुधोली व विकासपल्ली या दोन मतदान केंद्रावरही दुपारी १.३० वाजताच मतदान केंद्र बंद केल्याची तक्रार आहे.
आलापल्ली येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयासमोर दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडल्याची माहिती अहेरी पोलिसांनी दिली आहे. ही तुरळक घटना वगळता जिल्हाभर मतदान उत्साह व शांततेत पार पडले. चामोर्शी तालुक्यातील बऱ्याच गावांनी बहिष्काराचा इशारा दिला होता. त्यामुळे या भागात मतदानाची टक्केवारी कमी राहिली. आष्टी परिसरातील इल्लूर मतदान केंद्रावर तसेच चामोर्शी शहरातील १९९ व २०० क्रमांकाच्या जि. प. शाळेच्या मतदान केंद्रावर अत्यल्प मतदान झाले. या भागातील मतदारांनी मतदानावर बहिष्कार केल्यामुळे मतदान कमी झाले. गडचिरोली तालुक्यातील कनेरी मतदान केंद्रावरही बहिष्कारामुळे अत्यल्प मतदान झाले. झालेल्या मतदानातही गडचिरोेली विधानसभा मतदार संघात नोटाचा वापर मोठ्या प्रमाणावर झाल्याची चर्चा राजकीय पक्षांसह कार्यकर्त्यांमध्येही आहे. अहेरी विधानसभा क्षेत्रात सरासरी ७० टक्के मतदान झाले आहे. यामध्ये मुलचेरा तालुक्यात ७८.७५, सिरोंचा तालुक्यात ७६.५५, भामरागड तालुक्यात ६२.४३, अहेरी तालुक्यात ६८ तर एटापल्ली तालुक्यात ५५ टक्के मतदान झाले, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. तर आरमोरी विधानसभा क्षेत्रात सरासरी ७२ टक्के मतदान झाले आहे. यामध्ये आरमोरी तालुक्यात ६९.५८, कोरची तालुक्यात ७३, देसाईगंज तालुक्यात ७२.२०, कुरखेडा तालुक्यात ६१.७३ टक्के मतदान झाले आहे.
दुर्गम भागातून अहेरी विधानसभा क्षेत्रात सायंकाळी ७.३० वाजेपर्यंत २८६ मतदान केंद्रांपैकी २२८ मतदान केंद्राच्या पार्ट्या मुख्यालयात पोहोचलेल्या होत्या, अशी माहिती तेथील प्रतिनिधीने दिली आहे.
आरमोरी विधानसभा क्षेत्रात वघाळा जुना गावाने मतदानावर १०० टक्के बहिष्कार टाकला. एकाही मतदाराने मतदान केले नाही. महिलांचाही मोठा उत्साह यावेळी मतदानासाठी दिसून आला.
मात्र गडचिरोली शहरासह देसाईगंज या नगरपालिका क्षेत्रात मतदानाची टक्केवारी लोकसभा निवडणुकीपेक्षा कमी राहिली. त्यामुळे राजकीय पक्षांमध्येही धास्ती निर्माण झाली आहे. यावेळी पहिल्यांदाच अनेक मतदारांजवळ प्रशासनाने दिलेल्या स्लिप असल्याचे दिसून आले. नव मतदारांनीही मोठ्या उत्साहात मतदान केले. लोकसभा निवडणुकीनंतर १६ हजार मतदारांची भर पडली आहे. यातील बहुतांश मतदारांनी आज मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: 70 percent voting in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.