७० आॅटोरिक्षा परवान्यांचे नूतनीकरण
By Admin | Updated: November 14, 2015 01:37 IST2015-11-14T01:37:08+5:302015-11-14T01:37:08+5:30
उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने व्यपगत झालेल्या आॅटोरिक्षा परवान्यांचे नूतनीकरण करण्याची मोहीम आॅक्टोबर महिन्यापासून हाती घेतली आहे.

७० आॅटोरिक्षा परवान्यांचे नूतनीकरण
गडचिरोली : उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने व्यपगत झालेल्या आॅटोरिक्षा परवान्यांचे नूतनीकरण करण्याची मोहीम आॅक्टोबर महिन्यापासून हाती घेतली आहे. मागील दीड महिन्यात १० नोव्हेंबरपर्यंत सुमारे ७० आॅटोरिक्षा परवान्यांचे नूतनीकरण झाले असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत आणखी मुदतवाढ देण्यात आली असून या कालावधीतही परवान्यांचे नूतनीकरण न करणाऱ्या आॅटोरिक्षांवर कडक कारवाई करण्याचा इशाराही उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने देण्यात आला आहे.
ग्रामीण भागामध्ये व शहरामध्ये आॅटोरिक्षांच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वाहतूक केली जाते. गडचिरोली जिल्ह्यात एकूण ५५९ आॅटोरिक्षा आहेत. यापैकी सुमारे १९८ आॅटोरिक्षांच्या परवान्यांचे नूतनीकरण मागील अनेक वर्षांपासून झाले नाहीत. परवाने नूतनीकरणासाठी यापूर्वी उपप्रादेशिक परिवहन विभाग १५ हजारांपेक्षा अधिक शुल्क आकारत होते. त्यामुळेही बहुतांश आॅटोरिक्षा चालक आणखी परवान्याचे नूतनीकरण करण्यास धजावत नव्हते. ही परिस्थिती गडचिरोलीसह संपूर्ण राज्यात होती. परवान्यासह आॅटोरिक्षा चालविणे अवैध असल्याने शासनाने शुल्कात सूट देऊन आॅक्टोबर महिन्यापासून आॅटोरिक्षांचे परवाने नूतनीकरण करण्याची मोहीम हाती घेतली. माध्यमांमधून जनजागृती करून आॅटोरिक्षा चालकांनी सवलतीच्या दरात परवाने नूतनीकरण करावे, असे आवाहन केले होते. त्याचबरोबर ३१ आॅक्टोबर रोजी अतिरिक्त परिवहन आयुक्त सतीश सहस्त्रबुद्धे यांनी पत्रकार परिषद घेऊन परवाने नूतनीकरण करण्याचे आवाहन आॅटोरिक्षा चालक व मालकांना केले होते. जे आॅटोरिक्षा चालक परवाना नूतनीकरण करणार नाही, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशारासुद्धा दिला होता. त्यानंतर मात्र आॅटोरिक्षा चालकांनी स्वत:हून परवाने नूतनीकरण करण्यास सुरुवात केली.
व्यपगत झालेल्या १९८ परवानाधारकांपैकी १० नोव्हेंबरपर्यंत सुमारे ७० आॅटोरिक्षा चालकांनी परवाने नूतनीकरण केले आहे. अजूनही १२८ आॅटोरिक्षा चालकांनी परवान्यांचे नूतनीकरण केले नाही. यापूर्वी १६ नोव्हेंबरपर्यंत नूतनीकरण करण्याची अंतिम तारीख ठरविण्यात आली होती. मात्र आॅटोरिक्षा चालकांकडून नूतनीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आणखी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या कालावधीनंतर उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने आॅटोरिक्षांची तपासणी मोहीम हाती घेतली जाणार आहे व त्यामध्ये परवाना नूतनीकरण न झाल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे आॅटोरिक्षा चालकांनी स्वत:हून परवाने नूतनीकरण करावे, असे आवाहन एआरटीओ एस. पी. फासे यांनी केले आहे. (नगर प्रतिनिधी)