वन्यजीवांसाठी ६७३ नवीन जलस्रोत

By Admin | Updated: April 27, 2016 01:16 IST2016-04-27T01:16:48+5:302016-04-27T01:16:48+5:30

वन्यजीवांची जंगलामध्येच तहान भागून ते गावाकडे धाव घेऊ नयेत, यासाठी वन विभागाने २०१५-१६ या वर्षात १२ कोटी १९ लाख रूपये खर्चुन जंगलामध्ये ६७३ नवीन जलस्रोत निर्माण केले आहेत.

673 new water resources for wildlife | वन्यजीवांसाठी ६७३ नवीन जलस्रोत

वन्यजीवांसाठी ६७३ नवीन जलस्रोत

१२ कोटींचा खर्च : ३५२ खोदतळ्यांचे बांधकाम
गडचिरोली : वन्यजीवांची जंगलामध्येच तहान भागून ते गावाकडे धाव घेऊ नयेत, यासाठी वन विभागाने २०१५-१६ या वर्षात १२ कोटी १९ लाख रूपये खर्चुन जंगलामध्ये ६७३ नवीन जलस्रोत निर्माण केले आहेत. या जलस्रोतांच्या माध्यमातून वन्य प्राण्यांची तहान भागविण्याचा प्रयत्न वन विभागाकडून केला जात आहे.
गडचिरोली जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र १६ हजार ५१७ चौरस किमी एवढे आहे. त्यापैकी १२ हजार ५७६ चौरस किमी अंतरावर वनक्षेत्र आहे. एकूण भौगोलिक क्षेत्राच्या तुलनेत सुमारे ७६ टक्के वनक्षेत्र आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या घनदाट जंगलात बिबट्यापासून ते सस्यापर्यंत अनेक वन्यजीव आहेत. या वन्यजीवांना हिवाळा व पावसाळ्यात पाणीटंचाई जाणवत नाही. मात्र एप्रिल महिन्यापासून जंगलातील लहान-मोठे जलस्रोत आटण्यास सुरुवात होते. त्यामुळे उन्हाळ्यात अन्न जरी जंगलात मिळत असले तरी पाण्यासाठी गावांजवळ असलेल्या पाणवट्यांचा आसरा वन्यजीवांना घ्यावा लागतो. गावाच्या जवळपास वन्यजीव आल्यानंतर त्यांची कुत्रा किंवा मानवाकडून शिकार होत असल्याच्या अनेक घटना आजपर्यंत घडल्या आहेत. वन्यजीवांची तहान जंगलातच भागल्यास ते गावाकडे धाव घेणार नाही, या उद्देशाने वन विभागाच्या मार्फतीने जंगलातच जलस्रोत तयार केले जातात.
२०१४ मध्ये वन विभागाच्या मार्फतीने सुमार १९३ जलस्त्रोत तयार केले होते. त्यासाठी १ कोटी ४५ लाख रूपयांचा निधी खर्च झाला होता. २०१४-१५ या वर्षात ४७६ जलस्त्रोत तयार करण्यात आले होते. त्यावर ८ कोटी ९४ लाख ७५ हजार रूपये खर्च झाले होते. २०१५-१६ मध्ये वन विभागाच्या मार्फतीने १० सिमेंट बंधारे बांधले आहेत. त्यासाठी ३० लाख १८ हजार रूपये खर्च आला आहे. २ लाख ७९ हजार खर्च करून २ वनतळे बांधले आहेत. ४ कोटी २१ लाख ४८ हजार रूपये खर्चुन ३५२ खोदतळे, २१ लाख ९२ हजार रूपये खर्चून ३० दगडी बंधारे, १२ लाख ३४ हजार खर्चून ९ गॅबियन बंधारे, ७ कोटी १० लाख खर्च करून डीप सीसीटी व २० लाख रूपये खर्चुन १५ वनबंधारे बांधण्यात आली आहेत. असे एकूण ६७३ जलस्रोत निर्माण करण्यात आले असून त्यावर १२ कोटी १९ लाख २६ हजार रूपयांचा खर्च आला आहे. (नगर प्रतिनिधी)

ग्रामीण भागात प्रचार
वन्यजीव व मानव यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी वन विभागाच्या मार्फतीने ग्रामीण व जंगलव्याप्त भागांमध्ये जागृती अभियान राबविण्यात येत आहे. ग्रामसभांच्या ठिकाणी प्रत्यक्ष जावून वन विभागाचे कर्मचारी वन्यजीवांचा संघर्ष कसा टाळावा, याबाबत मार्गदर्शन करीत आहेत. त्याचबरोबर पर्यावरण संवर्धनामध्ये वन्यजीवांचे असलेले महत्त्वही पटवून दिले जात आहे. त्याचबरोबर प्रसिद्धीपत्रके, सुविचार, विद्यार्थी, रॅली, कार्यशाळा, वन व्यवस्थापन समित्यांच्या सभा आदींच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे.

कॅमेरा ट्रॅप व जीपीएस यंत्रांचा वापर
वन्यजीवांच्या शिकारीचे प्रमाण साधारणत: उन्हाळ्यामध्ये वाढते. त्यामुळे या कालावधीत वन्यजीवांच्या हालचालीवर नियंत्रण राहावे, यासाठी काही विशिष्ट ठिकाणी वन विभागाच्या मार्फतीने पाणवठ्यांवर कॅमेरा ट्रॅपिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. तर काही ठिकाणी जीपीएस यंत्रांचाही वापर केला गेला आहे.

Web Title: 673 new water resources for wildlife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.