६५.९४ कोटींचा जिल्हा विकासावर खर्च
By Admin | Updated: January 16, 2016 01:55 IST2016-01-16T01:55:23+5:302016-01-16T01:55:23+5:30
जिल्ह्यातील विविध योजनांवर निधी खर्च करण्याकरिता २०१५-१६ चा सर्वसाधारण आराखडा १५६ कोटी ५८ लाख रूपयांचा नियोजनाच्या माध्यमातून तयार करण्यात आला होता.

६५.९४ कोटींचा जिल्हा विकासावर खर्च
२०१५-१६ आर्थिक वर्ष : वितरित तरतुदींपैकी ७० टक्के रक्कम खर्च; ५६ कोटी रूपये तरतुदींचे वाटप नाही
गडचिरोली : जिल्ह्यातील विविध योजनांवर निधी खर्च करण्याकरिता २०१५-१६ चा सर्वसाधारण आराखडा १५६ कोटी ५८ लाख रूपयांचा नियोजनाच्या माध्यमातून तयार करण्यात आला होता. यापैकी ९५ कोटी ८० लाख रूपयांची तरतूद वितरित करण्यात आली. एकूण निधीपैकी ६५.९४ कोटी रूपयांचा खर्च करण्यात आला. डिसेंबर २०१५ अखेर एकूण वितरित तरतुदीपैकी ७० टक्के रक्कम खर्च करण्यात आली आहे. चालू वर्षातील नियोजन आराखड्यातील ५६ कोटी रूपये तरतुदींचे वाटप अद्यापही करण्यात आले नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
२०१५-१६ साठी सर्वसाधारण आराखड्यात काही विभागातील संपूर्ण निधीचा खर्च करण्यात आला. तर काही विभागाने केवळ २० टक्केच निधी खर्च केलेले आहे. एकूण योजनांच्या निधीच्या खर्चाचे प्रमाण ६८.८३ टक्के आहे. तर कृषी व संलग्न सेवांमध्ये फलोत्पादनासाठी ६७ लाख रूपयांचा निधी मंजूर करून ५२ लाख रूपयांचा निधी वितरित करण्यात आला होता. त्यापैकी केवळ २ लाख रूपयांचा निधी खर्च करण्यात आला. एकूण पाटबंधारे व पूर नियंत्रण विभागासाठी वितरित ९८९.५७ निधीपैैकी ६६९.०७ निधी खर्च करण्यात आला आहे. याची टक्केवारी ६७.६१ टक्के आहे. एकूण गाभा व बिगर गाभा क्षेत्रात केवळ ६९.८२ टक्केच निधी खर्च झाला आहे. एकूण उद्योग क्षेत्रात एकूण खर्चाची टक्केवारी केवळ ४९.२५ टक्के आहे. संपूर्ण क्षेत्र उपक्षेत्रांमधील एकूण ९५८०.९० वितरित निधीपैकी ६५९४.१८ निधी खर्च झाला आहे. याची टक्केवारी ६८.८३ टक्के आहे. अनेक विभाग निधी खर्च करण्यात चालू वर्षात माघारल्याचेही दिसून येत आहे. आर्थिक वर्ष संपण्यास अत्यल्प अवधी असतानाही अनेक विभागाचा ५० ते ७० टक्के निधी अखर्चित असल्याने या विभागांसमोर योजनांवर १०० टक्के निधी खर्च करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. खर्च करण्यासाठी प्रत्येक विभागाने लगबग करण्यास सुरूवात केली असल्याचे दिसून येते. (शहर प्रतिनिधी)
दोन विभागाने गाठली खर्चात शंभरी
चालू आर्थिक वर्षाच्या सर्वसाधारण आराखड्यात एकूणच अनेक विभागांनी ५० टक्क्याहून खर्चाचे उद्दिष्ट गाठले असले तरी अनेक विभाग केवळ २० व त्याहून अधिक टक्के निधी खर्च करण्यात यश मिळविले आहे. मात्र ग्रामविकास विभागाने वितरित केलेल्या एकूण तरतुदींपैकी १०० टक्के खर्च केला आहे. या विभागाचा मंजूर नियतव्यय १०८२.७८ आहे. ४२२.१५ वितरित निधीपैकी संपूर्ण निधी खर्च करण्यात आला आहे. ऊर्जा विभागाने ५००.०० मंजूर नियतव्ययपैकी संपूर्ण प्राप्त निधी खर्च केला आहे. केवळ दोन विभागाने निधी खर्चाच्या टक्केवारीत शंभरी गाठली आहे.