पाच वर्षात ६३७ नागरिकांचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2016 01:21 IST2016-04-24T01:21:39+5:302016-04-24T01:21:39+5:30
गडचिरोली जिल्ह्यात २०११ ते २०१५ या पाच वर्षात सुमारे १ हजार १०३ अपघात घडले असून या अपघातांमध्ये ६३७ नागरिकांना जीव गमवावा लागला आहे.

पाच वर्षात ६३७ नागरिकांचा बळी
१ हजार १०३ अपघात : गडचिरोली जिल्ह्यात १ हजार ६४४ नागरिक जखमी
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात २०११ ते २०१५ या पाच वर्षात सुमारे १ हजार १०३ अपघात घडले असून या अपघातांमध्ये ६३७ नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. तर १ हजार ६४४ नागरिक जखमी झाले आहेत.
आर्थिक विकासाबरोबरच दिवसेंदिवस प्रवासी तसेच माल वाहतुकीच्या वाहनांची संख्या वाढत चालली आहे. मागील पाच वर्षात दुचाकी व चारचाकी या प्रवासी वाहनांमध्ये तीन पटीने वाढ झाली आहे. वाहने वाढली असली तरी त्या प्रमाणात रस्त्यांचे रूंदीकरण झाले नाही. काही रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले राहतात. रहदारीस सदर मार्ग योग्य नसतानाही त्यावरून दरदिवशी हजारो वाहने ये-जा करतात. या सर्वांचा परिणाम म्हणजे अपघातांमध्ये वाढ होत चालली आहे.
परिवहन विभागाने वाहतुकीचे नियम ठरवून दिले असले तरी काही वाहनचालक या नियमांचे पालन करीत नाही. त्यामुळेही अपघातांमध्ये वाढ होत चालली आहे. गडचिरोली जिल्ह्यात २०११ मध्ये एकूण २२२ अपघात घडले होते. त्यामध्ये १०९ नागरिक मृत्यूमुखी पडले. तर ३५४ नागरिक जखमी झाले. २०१२ मध्ये २७२ अपघातांमध्ये १७४ नागरिकांचा मृत्यू झाला. तर २८९ नागरिक जखमी झाले. २०१३ मध्ये २२४ अपघातांमध्ये ११४ नागरिकांचा मृत्यू तर ४०४ नागरिक जखमी झाले. २०१४ मध्ये १९९ अपघात घडले. यामध्ये १२५ नागरिकांचा मृत्यू तर ३३२ नागरिक जखमी झाले. २०१५ मध्ये १८६ अपघातांमध्ये ११५ नागरिक मृत्यूमुखी पडले तर २६५ नागरिक गंभीर जखमी झाले आहेत.
अपघातामध्ये जखमी झालेल्या व्यक्तीला एका तासाच्या आत किमान प्राथमिक उपचार मिळणे अत्यंत आवश्यक आहे. या एका तासाचे महत्त्व लक्षात घेऊन वैद्यकीय क्षेत्रामध्ये या कालावधीला ‘गोल्डन अवर’ असे संबोधल्या जाते. मात्र गडचिरोली जिल्ह्यात एटापल्ली, भामरागड, सिरोंचा, धानोरा या तालुक्यांमध्ये ३० ते ४० किमी अंतरावर प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला वेळेवर दवाखान्यात भरती करण्यासाठी वाहनसुद्धा मिळत नाही. त्यामुळे इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिरोली जिल्ह्यात अपघातांचे प्रमाण कमी असले तरी मृतकांची संख्या अधिक असल्याचे दिसून येते. (नगर प्रतिनिधी)