६२.८८ टक्के मतदान
By Admin | Updated: July 1, 2015 01:50 IST2015-07-01T01:50:14+5:302015-07-01T01:50:14+5:30
चामोर्शी तालुक्यातील दुर्गापूर पंचायत समिती गणाच्या पोटनिवडणुकीसाठी प्रशासनाच्या वतीने मंगळवारी

६२.८८ टक्के मतदान
दुर्गापूर पं.स. गणाची निवडणूक : गुरूवारी दोन उमेदवारांचा फैसला
चामोर्शी : चामोर्शी तालुक्यातील दुर्गापूर पंचायत समिती गणाच्या पोटनिवडणुकीसाठी प्रशासनाच्या वतीने मंगळवारी १२ मतदान केंद्रांवरून सकाळी ७.३० ते ३ या वेळेत मतदान प्रक्रिया घेण्यात आली. पं.स. गणाच्या या पोटनिवडणुकीत एकूण ६२.८८ टक्के मतदान झाले. चोख पोलीस बंदोबस्तात, शांततेत मतदानांची प्रक्रिया पार पडली.
दुर्गापूर पं.स. गणाच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टीतर्फे रमेश दुर्गे व काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, पिरिपा समर्थीत निनाद वासुदेव देठेकर हे दोन उमेदवार उतरले होते. राष्ट्रवादी काँग्रेसकडून यापूर्वी निवडून आलेले पं.स. सदस्य नेताजी तुरे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या दुर्गापूर पं.स. गणासाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. सुरूवातीला या पोटनिवडणुकीसाठी सहा उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले होते. मात्र नामांकन अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी चार उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज मागे घेतले. त्यामुळे या पोटनिवडणुकीत भाजपाचे रमेश दुर्गे व काँग्रेस-राकाँ व पिरिपा समर्थीत निनाद देठेकर यांच्यात थेट लढत झाली.
दुर्गापूर पं.स. गणामध्ये ३ हजार ६६३ पुरूष व ३ हजार ३९२ महिला असे एकूण ७ हजार ५५ मतदार संख्या आहे. मंगळवारी सकाळी ७.३० ते ३ या वेळेत २ हजार २९१ पुरूष व २ हजार १४५ महिला अशा एकूण ४ हजार ४३६ मतदारांनी १२ मतदान केंद्रांवरून उत्स्फुर्तपणे मतदान केले. चामोर्शीचे उपविभागीय अधिकारी जी. एम. तळपाडे, नायब तहसीलदार निवडणूक, एस. के. चडगुलवार व नायब तहसीलदार देवेंद्र दहीकर यांनी विविध केंद्रांना भेटी देऊन मतदान प्रक्रियेची स्थिती जाणून घेतली. दुर्गापूर पं.स. निर्वाचन गणासाठी झालेल्या पोट निवडणुकीची मतमोजणी २ जुलै रोजी गुरूवारला चामोर्शी तहसील कार्यालयाच्या परिसरात करण्यात येणार आहे. बाराही मतदान केंद्रांवरील पोलिंग पार्ट्या चोख पोलीस बंदोबस्तात चामोर्शीच्या तहसील कार्यालयात दाखल झाल्या आहेत. (शहर प्रतिनिधी)