जिल्ह्यात घरकुलावर ६०.८५ टक्के निधी खर्च
By Admin | Updated: March 22, 2015 00:18 IST2015-03-22T00:18:44+5:302015-03-22T00:18:44+5:30
इंदिरा आवास योजनेंतर्गत सन २०१४-१५ या वर्षात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला सात हजार ७९४ घरकुलाचे उद्दीष्ट होते.

जिल्ह्यात घरकुलावर ६०.८५ टक्के निधी खर्च
गडचिरोली : इंदिरा आवास योजनेंतर्गत सन २०१४-१५ या वर्षात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला सात हजार ७९४ घरकुलाचे उद्दीष्ट होते. तेवढेच घरकूल मंजूर करण्यात आले. आतापर्यंत ७ हजार ७९४ पैकी ७ हजार ७६१ लाभार्थ्यांनी घरकूल बांधकाम सुरू केले. या घरकूल लाभार्थ्याला २६ कोटी ६८ लाख ४४ हजार रूपयांचे अनुदान पहिल्या हप्त्यात वितरित करण्यात आले. याची टक्केवारी ९२.५३ टक्के आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने आतापर्यंत घरकुलांवर ६०.८५ टक्के निधी खर्च केला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
दारिद्र्य रेषेखालील गरीब नागरिकांना हक्काचे घर मिळावे, यासाठी शासनाने इंदिरा आवास योजना अंमलात आणली. या योजनेंतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या नियंत्रणाखाली पंचायत समितीमार्फत घरकुलाचे बांधकाम करण्यात येते. मंजूर करण्यात आलेल्या लाभार्थ्यांनी घरकुलाचे काम सुरू केल्यानंतर व तशी माहिती दिल्यानंतर पहिल्या हप्त्याचे अनुदान संबंधित लाभार्थ्यांना अदा केले जाते.
अहेरी तालुक्यातील मंजूर १ हजार ४२५ लाभार्थ्यांपैकी १ हजार १७० लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याची १ हजार ५१ लक्ष रूपये वितरित करण्यात आले आहे. आरमोरी तालुक्यातील ४५५ लाभार्थ्यांना ४५१ लक्ष रूपये वितरित करण्यात आले. भामरागड तालुक्यातील ५७९ लाभार्थ्यांना ५६२ लक्ष रूपये तर चामोर्शी तालुक्यातील ५७३ लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे ५३९ लक्ष रूपये वितरित करण्यात आले. देसाईगंज तालुक्यातील ९२ लाभार्थ्यांना ९२ लक्ष रूपये तर धानोरा तालुक्यातील ९६१ लाभार्थ्यांना ९६१ लक्ष रूपये वितरित करण्यात आले. एटापल्ली तालुक्यातील ५३९ लाभार्थ्यांना ५२३ लक्ष रूपये वितरित करण्यात आले. गडचिरोली तालुक्यातील लाभार्थ्यांना एकूण ४५२ लक्ष, कोरची तालुक्यातील लाभार्थ्यांना एकूण ६९२, कुरखेडा तालुक्यातील लाभार्थ्यांना ९०८ लक्ष रूपये, मुलचेरा तालुक्यातील लाभार्थ्यांना ३१७ लक्ष रूपये व सिरोंचा तालुक्यातील लाभार्थ्यांना ६६४ रूपयाचे अनुदान पहिल्या हप्त्यात वितरित करण्यात आल्याची माहिती आहे. जिल्ह्यातील ७ हजार ७९४ लाभार्थ्यांपैकी ७ हजार ७६१ लाभार्थ्यांच्या घरकुलावर आतापर्यंत एकूण २६ कोटी ६८ लाख ४४ हजार रूपये खर्च झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
इंदिरा आवास योजनेंतर्गत वितरित करण्यात आलेल्या पहिल्या हप्त्यातील निधीची अहेरी तालुक्यातील टक्केवारी ५३.७५ आहे. आरमोरी तालुक्यातील अनुदान वितरणाची टक्केवारी ९९.३४ आहे. भामरागड तालुक्यातील अनुदान वितरणाची टक्केवारी ९३.०५ आहे. चामोर्शी तालुक्यातील अनुदान वितरणाची टक्केवारी ८४.७५ आहे. देसाईगंज तालुक्यात पहिल्या हप्त्याचे अनुदान १०० टक्के वितरित करण्यात आले आहे. धानोरा तालुक्यातील अनुदान वितरणाची टक्केवारी ९८.६७ तर एटापल्ली तालुक्याची टक्केवारी ९७.५७ आहे.
१३ कोटी ३१ लाख निधीची प्रतीक्षा
इंदिरा आवास योजनेंतर्गत घरकुलांसाठी केंद्र व राज्य सरकारकडून अनुसूचित जमाती उपयोजना व अनुसूचित जाती उपयोजनेच्या लेखाशिर्षाखाली जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला निधी मिळत असतो. जिल्हाभरात सध्या घरकुलाचे काम जोमात सुरू आहे. तर काही घरकुलांचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. टीएसपीचे १० कोटी ८४ लाख व एससीपीचे १ कोटी २७ लाख असे एकूण १२ कोटी ११ लाख व इतर १३ कोटी ३१ लाखांच्या निधीची प्रतीक्षा आहे.