६० ट्रॅप कॅमेरे, पथकही शोधतेय पण, तीन बळी घेणारा वाघ सापडेना!
By गेापाल लाजुरकर | Updated: January 7, 2024 19:49 IST2024-01-07T19:45:42+5:302024-01-07T19:49:26+5:30
‘जी-१८’ हल्लेखोर वाघाची वाकडी परिसरात दहशत.

६० ट्रॅप कॅमेरे, पथकही शोधतेय पण, तीन बळी घेणारा वाघ सापडेना!
गडचिरोली : गडचिरोली वनपरिक्षेत्रातील वाकडी परिसरात दोन महिन्यांत तीन महिलांचा बळी घेणाऱ्या जी-१८ वाघाची दहशत कायम असून त्या वाघाला जेरबंद करण्यासाठी परिसरात ६० ट्रॅप कॅमेरे लावले आहेत. वाघाचे लोकेशन कॅमेऱ्याद्वारे घेतले जात आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून आलेले पथकसुद्धा मागावर आहे; परंतु पथकाला वाघ हुलकावणी देत आहे.
वाकडी परिसरात गेल्या पाच वर्षांपासूनच वाघांचा वावर आहे. परंतु या परिसरात मानवावर वाघांनी हल्ले केले नव्हते. २४ नोव्हेंबरला हिरापूर व १५ डिसेंबर २०२३ रोजी गोविंदपूर व नवीन वर्षांत ३ जानेवारीला वाकडी येथील महिलेचा बळी वाघाने घेतला. तर मागील वर्षाअखेर ३० डिसेंबरला बाेदली येथील एका महिलेला जखमी केले. हे सर्व हल्ले जी-१८ वाघानेच केले. ही बाब स्पष्ट झाल्यानंतर वाघाला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने ताडाेबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातून विशेष चमू बोलावली. स्थानिक एक चमू नेमली, तसेच परिसरात ६० ट्रॅप कॅमेरे लावले. दोन रेडे शिकार सापळे (बेट) सुद्धा लावले आहेत. वाघाच्या हालचालींवर पथक लक्ष ठेवून आहे. वनविभागाकडून परिसरातील लोकांमध्ये जागृती केली जात आहे.
लोकेशन मिळेना
जी-१८ ह्या हल्लेखोर वाघाला जेरबंद करण्यासाठी ताडोबा येथील डॉ. रविकांत खोब्रागडे यांची चमू तीन दिवसांपूर्वी दाखल झाली. यापूर्वी मुडझा, वाकडी, हिरापूर मारोडा, गुरवळा, गोविंदपूर आदी परिसरात ट्रॅप कॅमेरेसुद्धा लावले; परंतु सदर वाघ हुलकावणी देत आहे. त्याचे निश्चित लोकेशन मिळत नसल्याने जेरबंद करण्याची मोहीम लांबत आहे.
वाकडीतील मुलांसाठी वाहनाची सोय
वाकडी गावातील अनेक विद्यार्थी गडचिरोली येथे शिक्षणासाठी जातात. ते संध्याकाळी उशिरापर्यंत घरी पोहोचतात. त्यांना धोका होऊ नये यासाठी वनविभागाने गडचिरोली-चामोर्शी मार्गावरील फाट्यापासून वाकडीपर्यंत जाण्यासाठी वाहनाची सोय केली. विद्यार्थी व उशिरा घरी जाणाऱ्या लाेकांनाही सुरक्षितरित्या घरी पोहोचविले जात आहे.
जी-१८ वाघाला जेरबंद करण्यासाठी वन विभाग प्रयत्नशील आहे. वाघाच्या प्रत्येक हालचालींवर ट्रॅप कॅमेरांद्वारे नजर आहे. बेटसुद्धा बांधले आहेत. काही भागांत वाघाचे पगमार्कसुद्धा आढळून आले आहेत. लवकरच वाघ जेरबंद केला जाईल. तोपर्यंत नागरिकांनी जंगलात जाऊ नये. वन विभागाला सहकार्य करावे.
-मिलिश शर्मा, उपवन संरक्षक, वनविभाग, गडचिरोली