शौचालय बांधकामासाठी ६० लाखांची तरतूद
By Admin | Updated: July 8, 2014 23:27 IST2014-07-08T23:27:19+5:302014-07-08T23:27:19+5:30
जिल्ह्यात २०१४-१५ यावर्षात एकूण १ हजार १८४ वैयक्तीक शौचालय बांधकामासाठी जिल्हा नियोजन व विकास समितीने जिल्हा वार्षिक योजनेच्या २०१४-१५ च्या आराखड्यात ६०.३८ लक्ष रूपयाची तरतूद केली आहे.

शौचालय बांधकामासाठी ६० लाखांची तरतूद
गडचिरोली : जिल्ह्यात २०१४-१५ यावर्षात एकूण १ हजार १८४ वैयक्तीक शौचालय बांधकामासाठी जिल्हा नियोजन व विकास समितीने जिल्हा वार्षिक योजनेच्या २०१४-१५ च्या आराखड्यात ६०.३८ लक्ष रूपयाची तरतूद केली आहे.
निर्मल भारत अभियान व महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून वैयक्तीक शौचालयाची योजना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागात राबविली जाते. या शौचालय बांधकामासाठी केंद्र व राज्य शासनाकडून लाभार्थ्याला अनुदान मिळते. सदर अनुदान सुरूवातीला जिल्हा नियोजन व विकास समितीला प्राप्त होते. डीपीडीसीच्या बैठकीत या अनुदानाला मंजुरी दिल्या जाते. त्यानंतर या शौचालय बांधकामाचे शासनाकडून मिळालेला निधी जिल्हा परिषदेच्या यंत्रणेकडे वळते केले जाते. १० हजार रूपये किंमतीची वैयक्तीक शौचालय बांधकामाची योजना आहे. प्रत्येक लाभार्थ्याला निर्मल भारत अभियानाकडून ४ हजार ६००, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनूतन ४ हजार ५०० रूपये अनुदान मिळते. तसेच लाभार्थ्याला लाभार्थी हिस्सा ९०० रूपये भरावे लागतात. अशा प्रकारे १० हजार रूपयातून वैयक्तीक शौचालय उभारल्या जाते. सन २०१४-१५ या वर्षात ३१ ग्रामपंचायतीमध्ये एकूण १० हजार ६६६ वैयक्तीक शौचालय बांधकामाचे उद्दीष्ट संबंधित यंत्रणेला देण्यात आले आहे. सदर शौचालय मार्च २०१४ अखेर पूर्ण करायचे आहे. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर झाल्यानंतर शौचालय बांधकामाला सुरूवात केली जाते. त्यानंतर बांधकामाचे स्वरूप पाहून दोन ते तीन टप्प्यात लाभार्थ्याला शौचालयाचे अनुदान दिले जाते. या योजनेच्या लाभासाठी संबंधित ग्रामपंचायतीकडून जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव सादर होणे गरजेचे आहे. (स्थानिक प्रतिनिधी)