चारचाकी वाहनासह ६ लाख ६३ हजारांचा दारूसाठा जप्त
By Admin | Updated: December 19, 2015 01:26 IST2015-12-19T01:26:40+5:302015-12-19T01:26:40+5:30
आरमोरी-वडसा मार्गावर आयटीआय समोर विशेष दारूबंदी पथकाने चारचाकी वाहनासह ६ लाख ६३ हजार २०० रूपयांचा अवैध दारूसाठा जप्त केला आहे.

चारचाकी वाहनासह ६ लाख ६३ हजारांचा दारूसाठा जप्त
वडसा मार्गावरील कारवाई : नागपूर व नागभीडचा आरोपी अटकेत
आरमोरी : आरमोरी-वडसा मार्गावर आयटीआय समोर विशेष दारूबंदी पथकाने चारचाकी वाहनासह ६ लाख ६३ हजार २०० रूपयांचा अवैध दारूसाठा जप्त केला आहे. या प्रकरणात नागपूर व नागभीड येथील आरोपीला अटक करण्यात आली आहे.
१८ डिसेंबर रोजी आरमोरी-वडसा मार्गावर एमएच ३४ एए ८००१ या चारचाकी वाहनातून शहान सलीम खान (२१) रा. नागपूर व स्वप्नील श्यामराव पाल (२०) रा. मांगली ता. नागभीड जि. चंद्रपूर हे दोघे १८० एमएलच्या देशी दारूचे नऊ नग बॉक्स अशा ४३२ निपा ४३ हजार २०० रूपयांचा माल तर ९० एमएलच्या ४४ नग बॉक्स प्रमाणे ४ हजार ४०० निपा २ लाख २० हजार रूपये किमतीचा माल व ४ लाख रूपयांचे चारचाकी वाहन घेऊन येत होते. त्यावेळी पोलिसांनी त्यांना अडवून सदर माल जप्त केला. या प्रकरणी आरमोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरमोरी तालुक्यात मागील महिन्यापासून अवैध दारूच्या विक्रीत प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. याकडे पोलिसांनी लक्ष देण्याची मागणी आहे. (प्रतिनिधी)