57 टक्के लाेक अजूनही लसीकरणापासून दूरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2021 05:00 IST2021-08-07T05:00:00+5:302021-08-07T05:00:57+5:30
सुरुवातीच्या कालावधीत नागरिकांमध्ये काेराेना लसविषयी गैरसमज असल्याने नागरिक लस घेण्यास धजावत नव्हते. मात्र आराेग्य विभागाने नागरिकांमध्ये जागृती केल्यानंतर हळूहळू नागरिक लसीकरणास पुढे येऊ लागले आहेत. त्यातही शहरी भागातील नागरिकांचेच जास्त प्रमाणात लसीकरण झाले असल्याचे दिसून येत आहे. लसीकरणाच्या तालुकानिहाय आकडेवारीकडे नजर टाकल्यास दुर्गम भागातील नागरिक लस घेण्यास तयार हाेत नसल्याचे दिसून येत आहे.

57 टक्के लाेक अजूनही लसीकरणापासून दूरच
दिगांबर जवादे
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : जास्तीत जास्त नागरिकांचे काेराेना लसीकरण व्हावे यासाठी आराेग्य विभाग व प्रशासन प्रयत्न करीत असला तरी जिल्ह्यातील १८ पेक्षा अधिक वय असलेल्या ४३ टक्केच नागरिकांचे लसीकरण झाले आहे. ५७ टक्के लाेकसंख्या अजूनही लसीकरणापासून दूरच असल्याचे दिसून येते. काेराेनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याने जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्याचे आव्हान आराेग्य विभागासमाेर आहे.
सुरुवातीच्या कालावधीत नागरिकांमध्ये काेराेना लसविषयी गैरसमज असल्याने नागरिक लस घेण्यास धजावत नव्हते. मात्र आराेग्य विभागाने नागरिकांमध्ये जागृती केल्यानंतर हळूहळू नागरिक लसीकरणास पुढे येऊ लागले आहेत. त्यातही शहरी भागातील नागरिकांचेच जास्त प्रमाणात लसीकरण झाले असल्याचे दिसून येत आहे. लसीकरणाच्या तालुकानिहाय आकडेवारीकडे नजर टाकल्यास दुर्गम भागातील नागरिक लस घेण्यास तयार हाेत नसल्याचे दिसून येत आहे.
गडचिराेली जिल्ह्यात १८ वर्ष वयाच्या पुढील लाेकसंख्या जवळपास ८ लाखाच्या घरात आहे. १८ वर्षापुढीलच नागरिकांना लस दिली जात असल्याने सध्या लसीकरणाचे उद्दिष्ट हेच मानावे लागेल. ६ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यातील ३ लाख ४२ हजार ६०३ नागरिकांना लस देण्यात आली आहे. १८ वर्ष वयाच्या पुढील लाेकसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण ४३ टक्के आहे. त्यातही पहिला डाेस २ लाख ७९ हजार ६० नागरिकांनी तर दुसरा डाेस केवळ ६३ हजार ५४३ नागरिकांनी घेतला आहे.
‘प्राेजेक्ट मुंबई’समाेर लसीकरणाचे आव्हान
आजपर्यंत आराेग्य विभागाने लसीकरणाच्या जागृतीसाठी अनेक प्रयत्न केले आहेत. त्याचा ग्रामीण व शहरी भागात सकारात्मक परिणामही दिसून आला आहे. मात्र दुर्गम व आदिवासीबहूल भागात लसीकरणाचे प्रमाण अजूनही अत्यल्प आहे. लसीकरणाच्या जागृतीची जबाबदारी आता ‘प्राेजेक्ट मुंबई’ या संस्थेने घेतली आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी व प्राेजेक्ट मुंबई यांच्यात ५ ऑगस्ट राेजी सामंजस्य करारही झाला. त्यामुळे आतापर्यंत आराेग्य विभागाला जे काम करणे शक्य झाले नाही ते काम प्राेजेक्ट मुंबई ही संस्था कशा पद्धतीने यशस्वी करून दाखविते याकडे जिल्हावासीयांचे लक्ष राहणार आहे.
दुर्गम भागात लसीकरणाचे प्रमाण नगण्य
- एटापल्ली, भामरागड, सिराेंचा, काेरची, धानाेरा हे पाच तालुके आदिवासीबहूल आहेत. या तालुक्यांमध्ये मात्र लसीकरणाचे प्रमाण अतिशय कमी असल्याचे दिसून येते.
- एटापल्ली तालुक्यात केवळ ६ हजार २५७, भामरागड तालुक्यात ५ हजार ५४२, धानाेरा तालुक्यात १४ हजार ६६३, काेरची तालुक्यात केवळ ९ हजार ५७ नागरिकांचे लसीकरण झाले आहे.
- संबंधित तालुक्यांची संख्या लक्षात घेतली तर हे प्रमाण १० टक्केपेक्षाही कमी असल्याचे दिसून येते. यावरून आराेग्य विभागाचे प्रयत्न अयशस्वी झाल्याचे दिसून येते.
- दुर्गम भागातील नागरिकांचे मन वळविण्याचे माेठे आव्हान आराेग्य विभागाला पेलावे लागणार आहे.