५७ लाखांचा निधी गेला परत
By Admin | Updated: September 9, 2015 01:33 IST2015-09-09T01:33:11+5:302015-09-09T01:33:11+5:30
जिल्ह्यात ७८ टक्के जंगल असून केवळ २२ टक्के जमीन आहे. यातही मोठ्या प्रमाणात वन जमीन असून जमिनीच्या बऱ्याच भागावर गाव व शहर वसले आहे.

५७ लाखांचा निधी गेला परत
शेतजमीन न मिळाल्याचा परिणाम : कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजना
दिलीप दहेलकर गडचिरोली
जिल्ह्यात ७८ टक्के जंगल असून केवळ २२ टक्के जमीन आहे. यातही मोठ्या प्रमाणात वन जमीन असून जमिनीच्या बऱ्याच भागावर गाव व शहर वसले आहे. कसण्यायोग्य शेतजमीन खरेदीसाठी न मिळाल्यामुळे शासनाकडून सन २००४-०५ ते २००६-०७ या तीन वर्षात सहायक आयुक्त समाज कल्याण गडचिरोलीला कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभीमान योजनेंतर्गत मिळालेला तब्बल ५७ लाख ९ हजारांचा निधी शासनाला परत गेल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे.
अनुसूचित जातीमधील दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन शेतमजूर व नवबौध्द घटकांच्या सबलीकरणासाठी राज्य शासनाने कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान योजना सुरू केली. गडचिरोली जिल्ह्यात या योजनेची अंमलबजावणी २००४-०५ या वर्षांपासून सुरू झाली आहे. महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व सांस्कृतिक कार्यक्रीडा व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने अनुसूचित जातीतील दारिद्र्यरेषेखालील भूमिहिन शेतमजूर परित्यक्त्या, विधवा व स्त्रियांच्या कुटुंबीयांना उत्पन्नाचे स्त्रोत उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेच्या अटी व शर्ती पूर्ण करून योजनेत बसणाऱ्या कुटुंबाला शासनाकडून चार एकर कोरडवाहू जमीन किंवा दोन एकर ओलिताखालील (बागायती) जमीन उपलब्ध करून देण्यात येते. त्यात ५० टक्के रक्कम बिनव्याजी कर्ज व ५० टक्के रक्कम अनुदानाची या आधारावर सदर योजना राबविली जाते.
स्वाभिमान योजनेंतर्गत समाजकल्याण विभागाला २००४-०५ या वर्षात १० लाख, २००५-०६ या वर्षात ५० लाख, २००६-०७ या वर्षात १० लाख असे एकूण ७० लाखांचे अनुदान प्राप्त झाले. यापैकी ३७.५० लाखांची शेतजमीन खरेदी करण्यात आली असून १२.६४ लाख रूपये खर्च झाले आहे.
आतापर्यंत १४ लाभार्थ्यांना मिळाला लाभ
सहायक आयुक्त समाज कल्याण विभाग गडचिरोलीच्या वतीने कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजनेंतर्गत २००४-०५ पासून तर आतापर्यंत अनुसूचित जातीमधील दारिद्र्यरेषेखालील एकूण १४ लाभार्थ्यांना जमीन वितरित करून या योजनेचा लाभ देण्यात आला. २००४-०५ या वर्षात चामोर्शी तालुक्यातील वाघोली येथील तीन लाभार्थ्यांना ३ लाख २३ हजार रूपये किमतीची साडेसात एकर जमीन वितरित करण्यात आली. २००५-०६ या वर्षात सिरोंचा तालुक्यातील नऊ लाभार्थ्यांना ६ लाख ४७ हजार रूपये किमतीची २० एकर जमीन वितरित करण्यात आली. यामध्ये आठ एकर कोरडवाहू व १४ एकर ओलिताखालील शेतजमिनीचा समावेश आहे. २००६-०७ या वर्षात कोरची तालुक्यातील बेतकाठी येथील २ लाख ९४ हजार रूपये किमतीची आठ एकर कोरडवाहू शेतजमीन दोन लाभार्थ्यांना वितरित करण्यात आली, अशी माहिती विभागाच्या सूत्रांकडून मिळाली आहे.
दुष्काळामुळे केवळ दीड लाखांचीच कर्ज वसुली
सहायक आयुक्त समाज कल्याण विभाग गडचिरोलीच्या वतीने कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभीमान योजनेंतर्गत आतापर्यंत एकूण १२ लाख ६४ हजार रूपयांची शेतजमीन खरेदी करण्यात आली. सदर शेतजमीन योजनेच्या अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या १४ लाभार्थ्यांना वितरित करण्यात आली. १२ लाख ६४ हजार रूपयांपैकी ६ लाख ३२ हजार रूपयांचे अनुदान विभागाला शासनाकडून मिळाले आहे. ५० टक्क्याच्या वाट्यानुसार लाभार्थ्यांवर ६ लाख ३२ हजार रूपयांचे बिनव्याजी कर्ज होते. यापैकी लाभार्थ्यांकडून केवळ दीड लाख रूपयांची कर्ज वसुली आतापर्यत झाली असून ४ लाख ३२ हजार रूपयांचे कर्ज या योजनेच्या लाभार्थ्यांवर शिल्लक असल्याची माहिती मिळाली आहे.