५७ लाखांचा दंड वसूल
By Admin | Updated: February 22, 2016 01:32 IST2016-02-22T01:32:22+5:302016-02-22T01:32:22+5:30
महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संपूर्ण जिल्ह्यात गौणखनिजाच्या अवैध उत्खनन व वाहतूक प्रकरणी धाडसत्र राबवून....

५७ लाखांचा दंड वसूल
साडेदहा महिने : गौण खनिज अवैध उत्खनन व वाहतूकीचे ७७१ प्रकरणे
गडचिरोली : महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संपूर्ण जिल्ह्यात गौणखनिजाच्या अवैध उत्खनन व वाहतूक प्रकरणी धाडसत्र राबवून १ एप्रिल २०१५ पासून २० फेब्रुवारी २०१६ या साडेदहा महिन्यांच्या कालावधीत एकूण ७७१ प्रकरणे निकाली काढून गौणखनिज तस्करांकडून ५७ लाख २९ हजार ३७० रूपयांचा दंड वसूल केला. महसूल विभागाच्या या कारवाईने शासनाला महसूल मिळाला आहे.
गडचिरोली जिल्ह्यात रेती, गिट्टी, मुरूम आदीसह विविध प्रकारचे गौणखनिज आहेत. या खनिजाचे शासनाच्या नियमानुसार उत्खनन व वाहतूक होणे आवश्यक आहे. याची जबाबदारी शासनाने महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सोपविली आहे. मात्र अनेक लोक तसेच कंत्राटदार स्वत:च्या स्वार्थासाठी शासन नियम पायदळी तुडवून रात्रीच्या सुमारास चोरट्या मार्गाने गौण खनिजाचे अवैधरित्या उत्खनन व वाहतूक करतात. या संदर्भात महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी धाडसत्र राबवून त्यांच्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न करतात. या कारवाईमुळे शासनाला महसूल मिळतो.
गेल्या साडेदहा महिन्यांच्या कालावधीत गडचिरोली उपविभागातील गडचिरोली, धानोरा हे दोन तालुके मिळून महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धाडसत्र राबवून २७० प्रकरणे निकाली काढले. या प्रकरणातून एकूण १४ लाख ७३ हजार ४३० रूपयांचा दंड वसूल केला. चामोर्शी व मुलचेरा तालुक्याचा समावेश असलेल्या चामोर्शी उपविभागात महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गौणखनिजाच्या अवैधरित्या उत्खनन व वाहतुकीबाबतचे ७० प्रकरणे निकाली काढून संबंधित कंत्राटदाराकडून ४ लाख ८७ हजार ४० रूपयांचा दंड वसूल केला.
देसाईगंज व आरमोरी तालुक्याचा समावेश असलेल्या देसाईगंज उपविभागात २१७ प्रकरणे निकाली काढून एकूण ११ लाख ८८ हजार ९२० रूपयांचा दंड वसूल केला. कुरखेडा व कोरची तालुक्याचा समावेश असलेल्या कुरखेडा उपविभागात एकूण ९३ प्रकरणे निकाली काढून १६ लाख ३३ हजार ९४० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. अहेरी व सिरोंचा तालुक्याचा समावेश असलेल्या अहेरी उपविभागात ९२ प्रकरणे निकाली काढून ७ लाख ७६ हजार ४४० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. एटापल्ली व भामरागड तालुका समावेश असलेल्या एटापल्ली उपविभागात सर्वात कमी केवळ २९ प्रकरणे निकाली काढून १ लाख ६९ हजार ६०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. (स्थानिक प्रतिनिधी)