५६७ कामांना मंजुरी
By Admin | Updated: December 27, 2014 22:49 IST2014-12-27T22:49:43+5:302014-12-27T22:49:43+5:30
मागास क्षेत्र अनुदान निधी अंतर्गत जिल्हाभरात ग्रामपंचायतीस्तरावर सिमेंट काँक्रीट रस्ते, नाली बांधकाम, संरक्षण भिंत, विहिर बांधकाम आदीसह विविध प्रकारच्या एकूण ५६७ कामांना

५६७ कामांना मंजुरी
बीआरजीएफ : अखेर २१ कोटी ८२ लाखांचा निधी मिळाला
गडचिरोली : मागास क्षेत्र अनुदान निधी अंतर्गत जिल्हाभरात ग्रामपंचायतीस्तरावर सिमेंट काँक्रीट रस्ते, नाली बांधकाम, संरक्षण भिंत, विहिर बांधकाम आदीसह विविध प्रकारच्या एकूण ५६७ कामांना प्रशासकीय व तांत्रिक मान्यता मिळाली आहे. या कामांसाठी जिल्ह्याला २१ कोटी ८२ लाख रूपयाचा निधी प्राप्त झाला असल्याने बीआरजीएफची ही कामे आता सुरू होणार आहेत.
केंद्र, राज्य, जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या निधीतून सर्वच विकास कामे शक्य होत नाहीत. विकास कामात मागे राहिलेल्या गावांचा विकास साधण्यासाठी मागास क्षेत्र अनुदान निधींतर्गत दरवर्षी ग्रामपंचायतस्तरावर विविध कामे घेतली जाते. बीआरजीएफ अंतर्गत शासनाने ठरवून दिलेल्या १० सेक्टरमधील विकास कामे केली जातात. यामध्ये गावात सोलर लाईट, पाईप लाईन, सिमेंट काँक्रीट रस्ते, नाली, विहिरगाव बांधकाम, हातपंप, मोटारपंप खरेदी, अंगणवाडी, इमारत, अंगणवाडी किचन शेड, ग्रामपंचायत भवन, ग्रामपंचायत विस्तारीकरण, मोरी, दुकान गाळे बांधकाम, शाळा विद्युतीकरण, शाळेत पिण्याच्या पाण्याची सुविधा, खेळांचे मैदान, सार्वजनिक शौचालय, सांस्कृतिक भवन, कोंडवाडा बांधकाम, मुरूम रस्ते, समाज मंदिर व लहान पुलांचे बांधकाम आदी कामांचा समावेश आहे.
जि.प. प्रशासनाच्यावतीने बीआरजीएफच्या कामाबाबत ग्रामपंचायतस्तरावरून मागणी व प्रस्ताव मागविण्यात आले. त्यानंतर २०१४-१५ या वर्षाचा आराखडा निश्चित करण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी बीआरजीएफ अंतर्गत सन २०१४-१५ या वर्षाकरिता बाराही तालुक्यातील ग्रामपंचायतस्तरावरील ५६७ कामांना मंजुरी प्रदान केली. मात्र प्रशासनाला या कामाचा निधी मिळाला नव्हता. त्यामुळे बीआरजीएफची मंजूर कामे सुरू करण्यात आली नाही. दरम्यान शासनाने पाच दिवसांपूर्वी बीआरजीएफच्या या कामांसाठी २१ कोटी ८२ लाखाचा निधी प्रशासनाकडे वळता केला.
मंजूर करण्यात आलेल्या अहेरी तालुक्यातील ४० ग्रामपंचायतीमध्ये ६८ कामांचा समावेश आहे. आरमोरी तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतीमध्ये ३२, भामरागड तालुक्यातील २० ग्रामपंचायतीमध्ये २१, चामोर्शी तालुक्यातील ७६ ग्रामपंचायतीमध्ये ७९, देसाईगंज तालुक्यातील १९ ग्रा.पं.मध्ये २६, धानोरा तालुक्यातील ६२ ग्रा.पं.मध्ये ५७, एटापल्ली तालुक्यातील ३२ ग्रा.पं.मध्ये ४२, गडचिरोली तालुक्यातील ५१ ग्रा.पं.मध्ये ६६, कोरची तालुक्यातील ३० ग्रा.पं.मध्ये ३८, कुरखेडा तालुक्यातील ४५ ग्रा.पं.मध्ये ६५, मुलचेरा तालुक्यातील १७ ग्रा.पं.मध्ये ३०, सिरोंचा तालुक्यातील ८१ ग्रामपंचायतीमध्ये ४३ कामांचा समावेश आहे. मंजूर झालेली सदर कामे ग्रामपंचायतीमार्फत येत्या काही दिवसात सुरू होणार आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)