झाडीपट्टी रंगभूमीच्या ५५ कंपन्या सज्ज, नाट्यप्रयोगाच्या तालमींना सुरुवात

By दिलीप दहेलकर | Published: October 13, 2023 11:42 AM2023-10-13T11:42:22+5:302023-10-13T11:44:07+5:30

दिवाळीपासून प्रयोगाची राहणार धूम : दीड कोटींवर जाणार उलाढाल

55 companies of Zadhipatti Rangbhumi are ready, the rehearsals of the theater experiment have started | झाडीपट्टी रंगभूमीच्या ५५ कंपन्या सज्ज, नाट्यप्रयोगाच्या तालमींना सुरुवात

झाडीपट्टी रंगभूमीच्या ५५ कंपन्या सज्ज, नाट्यप्रयोगाच्या तालमींना सुरुवात

गडचिरोली : झाडीपट्टी रंगभूमीच्या नाट्य प्रयोगासाठी जवळपास ५५ नाट्य कंपन्या सज्ज झाल्या असून या कंपन्यांनी देसाईगंज (वडसा) येथे बुकिंगसाठी आपले कार्यालय सुरू केले आहे. झाडीपट्टी रंगभूमीवरील नाटकांच्या तालमींना सुरूवात झाली असून दिवाळीपासून ग्रामीण भागात झाडीपट्टीच्या नाट्य प्रयोगाची धूम राहणार आहे. एका नाट्य प्रयोगाला ५० ते ६० हजार रूपये कंपनी आकारत असते. यंदाच्या हंगामात या नाट्य प्रयोगाच्या माध्यमातून दीड कोटींपेक्षा अधिक आर्थिक उलाढाल होणार आहे.

झाडीपट्टी रंगभूमीचे माहेरघर म्हणून देसाईगंजला ओळखले जाते. याच नावाने विविध कंपन्यांनी यावर्षी नाट्यप्रयोग सादरीकरणासाठी तयारी पूर्ण केली आहे. अखिल झाडीपट्टी नाट्य मंडळ वडसाकडे व्यावसायिक नाटक सादर करणाऱ्या ५५ कंपन्यांनी नोंदणी केली आहे. नोव्हेंबरपासून तर जून अशा सात महिन्यांच्या कालावधीत नाट्यप्रयोग ग्रामीण भागात सादर केले जाणार आहेत. गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या चार जिल्ह्यांसह पुर्व विदर्भात झाडीपट्टीचे नाट्य प्रयोग सादर होत असतात.

तीन हजार जणांना मिळतो हंगामी रोजगार

झाडीपट्टी रंगभूमीच्या ५५ नाटक कंपन्यांमध्ये अनेक कलाकार, कामगार, वादक व इतर घटकांचा समावेश आहे. सर्व घटक मिळून अडीच ते तीन हजार जणांना सहा ते सात महिन्यांचा हंगामी रोजगार उपलब्ध होतो. ५५ कंपन्यांमध्ये स्त्री व पुरूष मिळून ९५० ते १ हजार कलावंत आहेत. एका नाट्य कंपनीत १५ कलावंतांचा संच असताो.

नावीन्यपूर्ण प्रयोग देण्यावर भर

झाडीपट्टी रंगभूमीवरील नाट्य लेखक, निर्माते व दिग्दर्शक दरवर्षी नावीन्यपुर्ण प्रयाेग सादर करून प्रेक्षकांची शाब्बासकी मिळविण्याचा प्रयत्न करतात. गाजलेल्या जुन्या नाटकाला रसिकांची पसंती तर मिळतेच. मात्र वेगळ्या धाटणीचे नावीन्यपूर्ण प्रयाेगालाही प्रेक्षक भरभरून दाद देतात. झाडीपट्टी रंगभूमीवर नावाजलेल्या आठ ते दहा कंपन्यांची अजुनही चलती आहे.

झाडीपट्टी रंगभूमीने तोडली सिमांची बंधने

झाडीपट्टी रंगभूमीचे नाट्यप्रयोग पुर्वी पुर्व विदर्भाच्या चारच जिल्ह्यात व्हायचे. मात्र आता या रंगभूमीने गेल्या दोन वर्षापासून या चार जिल्ह्यांच्या सिमा ओलांडल्या आहेत. नाटकाचा हा सिझन दिवाळीपासून सुरू होतो आणि होळीपर्यंत चालतो. या कालावधीत झाडीपट्टीत समावेश असलेल्या चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली व गोंदिया या जिल्ह्यातील प्रत्येक गावात नाटकांचे आयोजन होत असते. आता तर नागपूर व वर्धा जिल्ह्यातही नाटकांचे आयोजन सुरू झाले असल्याची माहिती आहे. एवढेच नाही तर झाडीपट्टी रंगभूमीने आंध्रप्रदेश व छत्तीसगड राज्यातही झेप घेतली आहे.

Web Title: 55 companies of Zadhipatti Rangbhumi are ready, the rehearsals of the theater experiment have started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.