५४७ दारू विक्रेत्यांवर कारवाई
By Admin | Updated: November 16, 2015 01:13 IST2015-11-16T01:13:34+5:302015-11-16T01:13:34+5:30
कायद्याने जिल्ह्यात दारूबंदी असतानाही झटपट पैसे कमविण्याच्या नादात अवैध दारू विक्रीचा व्यापार मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

५४७ दारू विक्रेत्यांवर कारवाई
साडेआठ महिन्यांत दारूबंदी पथकाने दारूसह १ कोटी ५६ लाखांचा मुद्देमाल केला जप्त
गडचिरोली : कायद्याने जिल्ह्यात दारूबंदी असतानाही झटपट पैसे कमविण्याच्या नादात अवैध दारू विक्रीचा व्यापार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली गठीत करण्यात आलेल्या विशेष जिल्हा दारूबंदी पथकाने १ मार्च ते १४ नोव्हेंबर २०१५ या साडेआठ महिन्यांच्या कालावधीत एकूण ५४७ दारू विक्रेत्यांवर कारवाई केली. तसेच ९० लाखांच्या दारूसह १ कोटी ५६ लाख ७७ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.
१ एप्रिल २०१५ पासून शेजारच्या चंद्रपूर जिल्ह्यात कायद्याने दारूबंदी करण्यात आली. अवैध दारू विक्रीला रोख लावण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात १ मार्च २०१५ पासून जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष दारू बंदी पथक गठीत करण्यात आले. या पथकाचे नेतृत्व सहायक पोलीस निरिक्षक विनायक कोळी करीत आहेत. त्यांच्या सोबतीला दोन वाहनचालकांसह १२ पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आल्या आहेत. सदर दारूबंदी पथक अवैध दारू विक्री व पुरवठ्याबाबत सातत्याने कानोसा घेऊन त्या-त्या भागात धाडसत्र राबवून अवैध दारूविक्रेत्याविरोधात दररोज कारवाई करीत असल्याचे दिसून येते. दारूबंदी पथकाने आतापर्यंत अवैध दारू विक्री व पुरवठ्याचे २४५ प्रकरणे दाखल केली आहेत. यात ४१७ पुरूष व १३० महिला अशा एकूण ५४७ दारू विक्रेत्या आरोपींवर मुंबई दारूबंदी कायद्यान्वये कारवाई केली. दारूबंदी पथकाने गेल्या साडेआठ महिन्यांच्या कालावधीत जवळपास १५ चारचाकी वाहन व ३५ दुचाकी वाहन तसेच तीन नाव जप्त केले आहेत. ५४७ दारू विक्रेत्यांकडून ९० लाख रूपयांची अवैध दारू जप्त केली.
दारूबंदी पथकाची नजर अवैध दारू विक्रेत्यांवर सातत्याने आहे. मात्र असे असतानाही आडमार्गाचा वापर करून गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध दारू येत आहे. मध्यप्रदेश, छत्तीसगड राज्यासह गोंदिया व भंडारा जिल्ह्यातून अवैध देशी, विदेशी दारूची आयात होत आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या दारूबंदीनंतर गडचिरोली जिल्ह्यातील अवैध दारू विक्रीला काही प्रमाणात आळा बसला आहे. मात्र पूर्वीच्या तुलनेत आता अवैध दारू विक्रेत्यांची संख्या वाढत चालली आहे. यात महिलांचा सहभागही सक्रीय असल्याचे दिसून येत आहे. (प्रतिनिधी)
३० वर अधिक दारू ठोक विक्रेते
प्रत्येक तालुक्यात तीन ठोक दारू विक्रेते व पुरवठादार सक्रिय आहेत. एकूण ३६ ठोक दारू विक्रेत्यांकडून जिल्ह्यातील चिल्लर दारू विक्रेत्यांना त्यांच्याकडून अवैध दारूचा पुरवठा होतो. गोंदिया, भंडारा जिल्हा तसेच मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यातून रेल्वेने देसाईगंजात दारूची आयात होते. लपून बसण्यासाठी पथकाच्या पोलिसांना जागा नसल्यामुळे अवैध दारू विक्रेते सतर्क होऊन पसार होत आहेत, असे विनायक कोळी यांनी सांगितले.
कठोर कायदा व दंड हवा
अवैध दारू विक्रेत्याविरोधात जिल्हा दारूबंदी पथक व पोलीस कारवाई करीत आहेत. मात्र अवैध दारू विक्रीबाबत कायदा शिथिल असल्याने दारू विक्रेत्यांना एक ते दोन दिवसात न्यायालयाकडून जामीन मिळतो. कायद्यान्वये दारू विक्रेत्यांवर फारच कमी प्रमाणात दंडाची रक्कम आकारल्या जाते. त्यामुळे दारू विक्रेत्यांची दिवसेंदिवस वाढत आहे. अवैध दारू विक्रीचा समूळ नायनाट करण्यासाठी कायदा कठोर करून दंडाची रक्कम वाढविणे अत्यावश्यक आहे.