५२ नक्षलपीडितांना एसटीत नोकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2018 22:55 IST2018-01-21T22:55:36+5:302018-01-21T22:55:51+5:30
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे मुंंबई येथे शनिवारी राष्ट्र कृतज्ञता दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यादरम्यान गडचिरोतील ५२ नक्षलपीडितांना एसटीमध्ये विविध पदांवर नोकरी दिल्याची व वीरपत्नींना आजीवन.....

५२ नक्षलपीडितांना एसटीत नोकरी
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे मुंंबई येथे शनिवारी राष्ट्र कृतज्ञता दिन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यादरम्यान गडचिरोतील ५२ नक्षलपीडितांना एसटीमध्ये विविध पदांवर नोकरी दिल्याची व वीरपत्नींना आजीवन एसटीचा प्रवास मोफत करण्यात आल्या असल्याच्या दोन घोषणा राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केल्या आहेत.
नक्षलपीडित कुटुंबातील १३ पुरूषांना चालक पदावर, २१ पुरूष व १३ महिलांना वाहक पदावर तर ३ पुरूष व २ महिलांना लिपीक पदावर नियुक्त करण्यात आले आहे. नोकरीचे नियुक्तीपत्रसुद्धा कार्यक्रमाच्या ठिकाणी देण्यात आले. नक्षलपीडित व्यक्तींना जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनात मुंबई येथे पाठविण्यात आले होते.
नक्षलपीडित बहुतांश कुटुंब आपल्या मूळ गावाला जाऊ शकत नाही. त्यांना गडचिरोली किंवा इतर तालुका स्थळांचा आधार घेऊन वास्तव्य करावे लागते. अशातच त्यांच्यासमोर रोजगाराची गंभीर समस्या निर्माण झाली होती. ही बाब लक्षात घेऊन राज्य परिवहन महामंडळाने त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.