वाहनांसह ५२ लाखांची दारू जप्त

By Admin | Updated: February 24, 2016 01:13 IST2016-02-24T01:13:06+5:302016-02-24T01:13:06+5:30

जिल्ह्यात उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे यांच्या नेतृत्वातील पथकाने ३२ लाखांची दारू पकडून नागपूर येथील ठोक विक्रेता अनंत जयस्वाल याच्यासह दोघाला अटक केली.

52 lakhs liquor was seized with vehicles | वाहनांसह ५२ लाखांची दारू जप्त

वाहनांसह ५२ लाखांची दारू जप्त

एकाच दिवशी : गडचिरोली एसडीपीओ पथक व पोलीस अधीक्षकाच्या दारूबंदी पथकाची कामगिरी
गडचिरोली : जिल्ह्यात उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे यांच्या नेतृत्वातील पथकाने ३२ लाखांची दारू पकडून नागपूर येथील ठोक विक्रेता अनंत जयस्वाल याच्यासह दोघाला अटक केली. जिल्हा पोलीस अधीक्षकाच्या विशेष दारूबंदी पथकाने मंगळवारी सापळे रचून तीन वाहनांसह २० लाखांवर दारूसाठा जप्त केला आहे. यावर्षातील पोलीस विभागाची ही सर्वात मोठी कारवाई अवैध दारूच्या व्यावसायिकांवर केली आहे.

दारूबंदी पथकाने पकडला २० लाखांवर माल
पोलीस अधीक्षकांच्या दारूबंदी पथकाने मंगळवारी विदेशी दारूची अवैध वाहतूक करणारे दोन चारचाकी वाहन वाकडी-शिवणीदरमयान शिवणी गावाच्या मुुख्य चौकात पकडले. या वाहनातून २० लाख ४७ हजार ८०० रूपयांची दारू व मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोटफोडी नदीच्या पुलाजवळ दबा धरून बसलेल्या पोलीस पथकाने ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली. कुरूड येथील चंद्रय्या गड्डमवार व जयरामपूर येथील अमित गोटपर्तीवार हे दोघे दोन चारचाकी वाहनाने विदेशी दारू आणत असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानंतर पोटफोडी नदी पुलाच्या आजुबाजुला सापळा रचून पोलीस पथकाने या वाहनांना पकडले. एमएच ३३ ए ४८२६ व एमएच ३३ ए २३४२ या वाहनात चंद्रय्या गड्डमवार, कैलाश प्रभाकर कन्नाके व लक्ष्मण मलय्या गोटपर्तीवार हे तिघे जण असल्याचे दिसून आले. त्यांच्याकडून २० लाख ८७ हजार ८०० रूपयांचा माल जप्त करण्यात आला. लक्ष्मण गोटपर्तीवार याच्या वाहनातून अमित लक्ष्मण गोटपर्तीवार हा इसम पळून गेला. पोलिसांनी या चौघांविरूध्द मुंबई दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. सदर कारवाई पथकाचे प्रमुख पोलीस निरिक्षक विनायक कोळी, पोलीस हवालदार कांबळे, परिमल बाला, ढवळे, चव्हारे, राठोड, दुधलकर, तायडे यांनी पार पाडली. (जिल्हा प्रतिनिधी)

नागपूरच्या जयस्वालसह दोघांना अटक

मध्य प्रदेशातून विनापरवाना नागपूर-आरमोरी मार्गे दारू आणली जात असल्याची गुप्त माहिती एसडीपीओ पथकाला प्राप्त झाली. त्यानुसार गडचिरोली तालुक्यातील येवली गावाजवळ सापळा रचून टाटा आयसर वाहन अडवून चौकशी केली असता, वाहनामध्ये १४ लाख ४४ हजार ४०० रूपये किमतीची दारू आढळून आली. दारूसह वाहन जप्त करण्यात आले. सदर कारवाई २३ फेब्रुवारीच्या रात्री १२.३० वाजताच्या दरम्यान करण्यात आली.
मागील काही दिवसांपासून मध्य प्रदेश राज्यातून गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारूची वाहतूक केली जात आहे. त्यामुळे या दारूवर उपविभागीय पोलीस अधिकारी पथकाने पाळत ठेवली होती. मध्यप्रदेशातून टाटा आयसर एमएच ४० एके ४२६८ या वाहनाने मंगळवारी दारू आणली जाणार आहे, अशी गुप्त माहिती एसडीपीओ पथकाला प्राप्त झाली.
त्यानुसार एसडीपीओ पथकाने येवली येथे नाकाबंदी करून वाहन अडविले. वाहनाची चौकशी केली असता, वाहनामध्ये गोवा स्पेशल विस्की कंपनीच्या ३०१ पेट्या आढळून आल्या. त्याची किमत १४ लाख ४४ हजार ८०० रूपये एवढी होते. २०० नग प्लास्टिकचे रिकामे ट्रे सुध्दा वाहनामध्ये होते. त्याची किमत चार हजार रूपये व टाटा आयसर वाहन असे एकूण ३२ लाख ४८ हजार ४०० रूपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.
दारूची वाहतूक करणारे आरोपी अनंत सुनील जयस्वाल (३२) रा. एमआयडीसी नागपूर, मोहम्मद शोयब मोहम्मद शकील शेख (२५) रा. जाफरनगर नागपूर या दोघांना पोलिसांनी अटक केली. आरोपीविरोधात मुंबई दारूबंदी कायदा कलम ९८ (क), ८५, ६५ (अ), (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे यांच्यासह पोलीस उपनिरिक्षक सिरसाठ, पोलीस हवालदार राजेंद्र तितीरमारे, सहायक फौजदार दोनाडकर, पोलीस हवालदार राऊत, श्रीनिवास, नाईक पोलीस दीपक डोंगरे, हिरामन आतला, अमोल बोरघरे, मंगेश तिवाडे यांनी केली. (नगर प्रतिनिधी)

Web Title: 52 lakhs liquor was seized with vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.