रबीसाठी ५१ लाखांचे कर्ज वाटपरबीसाठी ५१ लाखांचे कर्ज वाटप
By Admin | Updated: November 21, 2015 01:49 IST2015-11-21T01:40:41+5:302015-11-21T01:49:15+5:30
रबी हंगामाच्या पेरणीला सुरुवात झाली असून या हंगामासाठी गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत बँकांनी सुमारे ५१ लाख रूपयांचे कर्ज वितरण केले आहे.

रबीसाठी ५१ लाखांचे कर्ज वाटपरबीसाठी ५१ लाखांचे कर्ज वाटप
७९ शेतकऱ्यांनी घेतला लाभ :
धान कापणीनंतर रबीच्या पेरणीला येणार वेग
गडचिरोली : रबी हंगामाच्या पेरणीला सुरुवात झाली असून या हंगामासाठी गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत बँकांनी सुमारे ५१ लाख रूपयांचे कर्ज वितरण केले आहे. नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात पेरणीला वेग येणार असल्याने कर्ज वितरणाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे.
गडचिरोली जिल्ह्यात खरीपासह रबी पिकाचेही उत्पादन घेतले जाते. सौरपंप, डिझेल इंजिन, उपसा सिंचन योजना, विहीर यामुळे सिंचनाच्या सुविधा शेतकऱ्यांना उपलब्ध झाल्या असल्याने दिवसेंदिवस रबी हंगामाचे क्षेत्र गडचिरोली जिल्ह्यातही वाढत चालले आहे. चालू रबी हंगामात २३ हजार ४०० हेक्टरवर रबी पिकांची पेरणी होईल, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला असून त्यानुसार खत, कीटकनाशके व बियाण्यांचे नियोजन केले आहे.
रबी हंगामात गडचिरोली जिल्ह्यात सूर्यफूल, गहू, ज्वारी, संकरीत मका, हरभरा, लाखोळी, मूग, जवस, तीळ, करडई, भूईमूग, वाटाणा यांच्यासह भाजीपाला, टरबूज यांचेही उत्पादन घेतले जाते. या सर्व पिकांसाठी जमिनीची मशागत करण्यापासून बियाणे खरेदी करणे, कीटकनाशके, खतांचा खर्च करावा लागतो. त्याचबरोबर हजारो रूपये मजुरीवर खर्च करावे लागतात. त्यामुळे कर्ज काढल्याशिवाय शेतकऱ्याला पर्याय उरत नाही. शेतकऱ्याला पीक कर्जासाठी सावकाराच्या दारात उभे रहावे लागू नये, यासाठी प्रत्येक राष्ट्रीयकृत, सहकारी व ग्रामीण बँकांना कर्ज वितरणाचे उद्दिष्ट शासनाने ठरवून दिले आहे. रबी हंगामासाठी १७ कोटी २७ लाखांचे कर्ज वितरणाचे उद्दिष्ट सर्वच बँकांना दिले आहे.
आॅक्टोबर महिन्यापासूनच रबी हंगामाच्या मशागतीला सुरुवात झाली. ज्या शेतकऱ्यांची जमीन पावसाळ्यात पडीत होती, अशा शेतकऱ्यांनी आॅक्टोबर महिन्यातच पिकांची पेरणी केली. तर ज्या शेतात धानानंतर रबीची पेरणी केली जाणार आहे, त्यांची पेरणी डिसेंबर महिन्यात होणार आहे. रबी पिकांच्या लागवडीसाठी येणारा खर्च भागविण्यासाठी शेतकऱ्यांनी कर्ज काढण्यास सुरुवात केली आहे. जिल्हाभरातील ७९ शेतकऱ्यांनी ५१ लाखांचे कर्ज घेतले आहे. यामध्ये दोनच बँकांनी कर्ज वितरण केले आहे. यामध्ये सेंट्रल बँक आॅफ इंडियाने एका शेतकऱ्याला एक लाखांचे कर्ज तर स्टेट बँक आॅफ इंडियाने ७८ शेतकऱ्यांना ५० लाखांचे कर्ज वितरित केले आहे. बँकांना दिलेल्या उद्दिष्टाच्या केवळ ३ टक्केच साध्य झाले आहे. नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यातही काही शेतकरी कर्जाची मागणी करतात. त्यामुळे डिसेंबर अखेर कर्ज वितरणात वाढ होण्याची शक्यता आहे. (नगर प्रतिनिधी)
नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये मागणी वाढणार
गडचिरोली जिल्ह्यात सर्वसाधारणपणे धान पिकाच्या शेतातच धानपीक निघल्यानंतर रबी हंगामाची पेरणी केली जाते. धान कापणीला सध्या सुरूवात झाली आहे. धान कापणी झाल्याबरोबर रबी हंगामाची मशागत सुरू होते. जवळपास डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात पेरणीला सुरुवात होणार आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या बियाणे, कीटकनाशके, खते खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पैशाची गरज भासणार असून त्यासाठी कर्ज घ्यावे लागणार आहे. त्यामुळे सध्य:स्थितीत ५१ लाखांचेच कर्ज वितरण झाले असले तरी हा आकडा दोन कोटी पर्यंत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
खरिपात ६१ टक्के उद्दिष्ट साध्य
गडचिरोली जिल्ह्यात सुमारे दोन लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामात विविध पिकांची पेरणी करण्यात येते. यामध्ये धानाचा वाटा सुमारे ८० टक्के एवढा आहे. धानपिकाचा खर्च दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज घेतल्याशिवाय पर्याय राहत नाही. शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन शासनाने जिल्हाभरातील बँकांना १८२ कोटी ८० लाख रूपयांच्या कर्ज वितरणाचे उद्दिष्ट दिले होते. त्यापैकी ११२ कोटी २५ लाख रूपयांचे कर्ज वितरण झाले आहे. बँकांना दिलेल्या उद्दिष्टाच्या ६१ टक्के उद्दिष्ट साध्य झाले आहे. कोआॅपरेटिव्ह बँकेने ५२ कोटी ६४ लाख, ग्रामीण बँकांनी १३ कोटी ८९ लाख व संपूर्ण राष्ट्रीयकृत बँकांनी ४५ कोटी ७२ लाख रूपयांचे कर्ज वितरण केले आहे.