तणसाचे ढीग जळून ५० हजारांचे नुकसान
By Admin | Updated: April 28, 2017 01:10 IST2017-04-28T01:10:11+5:302017-04-28T01:10:11+5:30
तालुक्यातील चुरमुरा येथे गुरूवारी दुपारच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत तीन शेतकऱ्यांचे पाच तणसाचे ढीग जळून खाक झाले.

तणसाचे ढीग जळून ५० हजारांचे नुकसान
आरमोरी : तालुक्यातील चुरमुरा येथे गुरूवारी दुपारच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत तीन शेतकऱ्यांचे पाच तणसाचे ढीग जळून खाक झाले. या आगीत जवळपास तीस बंड्या तणस जळाले असून यामध्ये शेतकऱ्यांचे जवळपास ५० हजार रूपयांचे नुकसान झाले आहे.
चुरमुरा येथील गोंविदा गोहणे, तुळशीदास दिवटे व ज्ञानेश्वर चुधरी यांच्या मालकीचे तणसाचे ढीग गावाबाहेर ठेवण्यात आले होते. तणसाच्या ढिगाला कुंपण करून त्यात बैल सुध्दा बांधण्यात आले होते. गुरूवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास गोविंदा गोहणे यांच्या तणसीच्या ढिगाला अचानक आग लागली. आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले. आग जवळच असलेल्या तुळशीराम दिवटे, ज्ञानेश्वर चुधरी यांच्या तणसी ढिगापर्यंतही पोहोचली. धुराचे लोट बाहेर निघत असल्याचे लक्षात येताच गावकऱ्यांनी घटनास्थळ गाठून आग विझविण्याचा प्रयत्न केला. गावात दोन ठिकाणी विवाह असल्यामुळे वऱ्हाड्यांनीही धाव घेऊन आग विझविण्यासाठी मदत केली.
अग्नीशमन दलालाही पाचारण करण्यात आले. अग्नीशमन दल घटनास्थळी पोहोचेपर्यंत गावकऱ्यांनी थामदेव भोयर यांच्या मोटारपंपाने आग विझविण्याचा प्रयत्न केला. दुपारी २ वाजता अग्नीशमन दल घटनास्थळी दाखल झाले. दुपारी ३ वाजता यादरम्यान आग आटोक्यात आली. या आगीत जवळपास ५० हजार रूपयांचे नुकसान झाले. तणीस जळाल्याने जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. संबंधित शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी, अशी मागणी होत आहे. अतिउष्णतामानामुळे आगीच्या घटना वाढल्या आहेत. (वार्ताहर)