अहेरीच्या आमसभेला ५० टक्के अधिकारी गैरहजर

By Admin | Updated: February 25, 2015 01:44 IST2015-02-25T01:44:10+5:302015-02-25T01:44:10+5:30

स्थानिक पंचायत समितीच्या वतीने रविवारी राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली आमसभा घेण्यात आली.

50 percent officers absent in Aheri's general meeting | अहेरीच्या आमसभेला ५० टक्के अधिकारी गैरहजर

अहेरीच्या आमसभेला ५० टक्के अधिकारी गैरहजर

अहेरी : स्थानिक पंचायत समितीच्या वतीने रविवारी राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या अध्यक्षतेखाली आमसभा घेण्यात आली. या आमसभेत दुष्काळ, रस्ते, नाली बांधकाम, सिंचन, पाणीपुरवठा व कृषी विभागाच्या विविध विषयांवर वादळी चर्चा झाली.
यावेळी मंचावर जि. प. चे कृषी व पशुसंवर्धन सभापती अजय कंकडालवार, महिला व बालकल्याण सभापती सुवर्णा खरवडे, जि. प. सदस्य नंदा दुर्गे, अहेरी पं. स. चे सभापती रविना गावडे, उपसभापती सोनाली कंकडालवार, पं. स. सदस्य सुखदेव दुर्योधन, राजेश्वर रंगुलवार, आत्माराम गद्देकार, सुनिता मंथनवार, मंदा गावडे, अमावस्या रामटेके, यमुना आत्राम, अहेरीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कन्ना मडावी, तहसीलदार वाय. के. कुनारपवार, संवर्ग विकास अधिकारी सुभाष चांदेकर, रवींद्रबाबा आत्राम आदी उपस्थित होते.
या सभेला विविध विभागाचे जवळपास ५० टक्के अधिकारी व विभाग प्रमुख गैरहजर होते. यामुळे रखडलेल्या विकास कामांबाबत वस्तूस्थिती जाणून घेता आली नाही. त्यामुळे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी गैरहजर असलेल्या अधिकाऱ्यांना तत्काळ कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश बीडीओ व तहसीलदारांना दिले.
याप्रसंगी अहेरी तालुक्यात १०० टक्के दुष्काळी परिस्थिती असताना १८४ गावांपैकी केवळ २० गावांची पिकांची आणेवारी शून्य दाखविण्यात आली. त्यामुळे इतर गावातील शेतकऱ्यांवर अन्याय झाला, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित करून सभेत गदारोळ केला. त्यानंतर या सभेत संपूर्ण अहेरी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करावा, असा ठराव पारीत करण्यात आला. दुष्काळाबाबत उपस्थित नागरिक व शेतकऱ्यांनी कृषी विभागावर कमालीची नाराजी व्यक्त केली. सार्वजनिक बांधकाम विभाग व जि. प. बांधकाम विभागाच्या वतीने अहेरी तालुक्यात रस्ते व नाल्या बांधकामाबाबतचा देखावा केला जात आहे. वास्तविक सदर कामे योग्यरित्या सुरू नसल्याची बाब उपस्थित नागरिकांनी पालकमंत्र्यांपुढे मांडली. यावर पालकमंत्री आत्राम यांनी उपस्थित साबांविच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. मंजूर कामे तत्काळ पूर्ण करण्याचे त्यांनी निर्देश दिले.
अहेरी भागातील अहेरी, आलापल्ली, नागेपल्ली, गडअहेरी, बामणी, किष्टापूर आदी गावांमध्ये नियमित व पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने लाखो रूपये खर्च करून कार्यान्वित करण्यात आलेली नळपाणीपुरवठा योजना फेल झाल्याची बाबही पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: 50 percent officers absent in Aheri's general meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.