५० किमीच्या नाल्या रखडल्या

By Admin | Updated: April 27, 2015 01:12 IST2015-04-27T01:12:16+5:302015-04-27T01:12:16+5:30

संपूर्ण शहरात सद्यस्थितीत १४२ किमीच्या नाल्यांचे बांधकाम करण्यात आले असून ५० किमींच्या नाल्या अजूनही बांधण्यात आल्या नाही.

50 km nallah drains | ५० किमीच्या नाल्या रखडल्या

५० किमीच्या नाल्या रखडल्या

गडचिरोली : संपूर्ण शहरात सद्यस्थितीत १४२ किमीच्या नाल्यांचे बांधकाम करण्यात आले असून ५० किमींच्या नाल्या अजूनही बांधण्यात आल्या नाही. या नाली बांधकामासाठी जवळपास १५ कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे.
गडचिरोली शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्याबरोबर शहराचा विस्तारही वाढत चालला आहे. लोकवस्ती निर्माण झाल्यानंतर त्या परिसरात रस्ते व नालीचे बांधकाम करणे, पाण्याचा पुरवठा करणे ही जबाबदारी नगर परिषदेला उचलावी लागते. नगर परिषदेच्या मार्फतीने सद्यस्थितीत सुमारे १४२ किमीच्या नाल्या शहरात बांधण्यात आल्या आहेत. मात्र बऱ्याच नवीन वस्त्यांमध्ये पाच वर्षांपेक्षा अधिक कालावधी उलटूनही नालींचे बांधकाम करण्यात आले नाही.
शहराच्या स्वच्छतेत नाल्यांचे विशेष महत्त्व आहे. घरातील सांडपाणी वाहून जाण्यासाठी प्रत्येक वार्डात रस्त्याच्या बाजुला नाल्या असणे आवश्यक आहे. मात्र अनेक वार्डांमध्ये नाली बांधकाम झाला नसल्याने या वार्डातील पाणी नागरिकांच्या घरामध्ये शिरते. काही रस्त्यांवर सांडपाणी वाहत असल्याने रस्तेही खराब झाले आहेत. त्यामुळे नवीन वस्तीतील नागरिकांनी नगर परिषदेकडे नालीचे बांधकाम करण्यासाठी अर्ज सादर केले आहेत. मात्र नगर परिषद निधी नसल्याचे कारण पुढे करीत नाली बांधकाम करण्यास टाळाटाळ करीत आहे. जवळपास ५० किमीच्या नाल्या अजूनही बांधण्यात आल्या नाही. या नाल्यांच्या बांधकामासाठी पंधरा कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे.
नवीन वार्डांबरोबरच काही जुन्या वार्डांमध्येही नाल्यांचे बांधकाम अपूर्ण करण्यात आल्या आहे. अनेक नाल्यांची मागील काही वर्षांपासून डागडुजी करण्यात आली नाही. नालीच्या दोन्ही बाजू नालीमध्ये कोसळल्या आहेत. काही ठिकाणी नालीचे अस्तित्वच दिसत नाही. अशा तुटलेल्या नाल्या उपसताना कामगार वर्गालाही तारेवरची कसरत करावी लागते. त्यामुळे मजूरवर्ग सदर नाल्या उपसण्यास टाळाटाळ करतात. परिणामी या नाल्यांमध्ये गाळ व पाणी साचून त्यांची दुर्गंधी निर्माण होते. या दुर्गंधीचा त्रास सभोवतालच्या नागरिकांना सहन करावा लागत आहे. नगर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी निधी मिळावा यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू केला असला तरी अजूनपर्यंत यासाठी निधी प्राप्त झाला नाही. (नगर प्रतिनिधी)

Web Title: 50 km nallah drains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.