५० उद्योगांना संजीवनी
By Admin | Updated: August 14, 2016 01:25 IST2016-08-14T01:25:56+5:302016-08-14T01:25:56+5:30
पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत जिल्हाभरातील ५० उद्योगांना ८४ लाख ६१ हजार रूपयांची मदत...

५० उद्योगांना संजीवनी
८४ लाखांचे अनुदान : पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम
गडचिरोली : पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत जिल्हाभरातील ५० उद्योगांना ८४ लाख ६१ हजार रूपयांची मदत महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ व जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने करण्यात आली आहे. त्यामुळे सदर उद्योग स्थिरस्थावर होण्यास मदत झाली आहे. त्याचबरोबर बँकेच्या मार्फतीने जवळपास तीन कोटी रूपयांचे कर्ज सुध्दा वितरित करण्यात आले आहे.
सर्वच सुशिक्षीत बेरोजगारांना शासकीय नोकरी देणे सरकारलाही अशक्य आहे. त्यामुळे जास्तीत जास्त युवकांनी स्वयंरोजगार करून त्यामाध्यमातून स्वत:चा प्रपंच भागवावा व इतरांनाही रोजगार उपलब्ध करून द्यावा या उद्देशाने शासनाकडून उद्योजकांना मदत करण्यासाठी विविध योजना राबविल्या जातात.
उद्योगांना आर्थिक मदत करण्याबरोबरच त्यांना वेळोवेळी सल्ला व मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हास्तरावर महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ आहे. सदर मंडळ ग्रामीण भागातील बेरोजगार युवकांना रोजगार स्थापनेसाठी मदत करते. तर जिल्हा उद्योग केंद्र ग्रामीण व शहरी भागातील युवकांना मदत करते. उद्योजकांना मदत करण्यासाठी केंद्र शासनाने पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम राबविला आहे. या कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाने जिल्ह्यातील १४ उद्योजकांना २८ लाख रूपयांचे सहायक अनुदान वितरित केले आहे. त्याचबरोबर जिल्हा उद्योग केंद्राने सुध्दा ३६ उद्योगांना ५६ लाख ६१ हजार रूपयांचे सहायक अनुदान वितरित केले आहे. या अनुदानासोबतच बँकेच्या मार्फतीने जवळपास तीन कोटी रूपयांचे कर्ज सुध्दा उपलब्ध करून देण्यात आले आहे. शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानामुळे नवीन उद्योजकाला थोडे स्थिरस्तावर होण्यास मदत होते. त्यामुळे उद्योजक या सहायक अनुदानाची प्रतीक्षा करीत राहतात. (नगर प्रतिनिधी)
आॅनलाईन करावा लागणार अर्ज
मागील वर्षीपर्यंत उद्योगासाठी सहायक अनुदान पाहिजे असल्यास खादी ग्रामोद्योग मंडळ किंवा जिल्हा उद्योग केंद्राकडे प्रत्यक्ष जाऊन अर्ज करावा लागत होता. यावर्षीपासून मात्र पहिल्यांदाच आॅनलाईन पध्दतीने अर्ज स्वीकारले जात आहेत. आॅनलाईन अर्ज प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली असलेली समिती यावर विचार करणार आहे.
७७ लाखांचे उद्दिष्ट
महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाला सन २०१६-१७ या वर्षात १७ उद्योगांना ३३ लाख २३ हजार रूपयांचे सहायक अनुदान वितरित करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. तर जिल्हा उद्योग केंद्रातील २२ उद्योगांना ४४ लाख रूपयांचे सहायक अनुदान वितरित करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. दोन्ही विभागांच्या वतीने लाभार्थींचा शोध घेण्याचे काम सुरू झाले आहे.