५० डिस्ट्रिब्युशन बॉक्सची दुरूस्ती
By Admin | Updated: August 12, 2016 00:56 IST2016-08-12T00:56:07+5:302016-08-12T00:56:07+5:30
ट्रान्सफॉर्मरच्या खालीच लावण्यात आलेले डिस्ट्रिब्युशन बॉक्सची (डीबी) दुरूस्ती मागील अनेक वर्षांपासून रखडली होती

५० डिस्ट्रिब्युशन बॉक्सची दुरूस्ती
वीज विभागाचा उपक्रम : तुटलेले दरवाजे तसेच जुने ग्रिप व वायर बदलविले
गडचिरोली : ट्रान्सफॉर्मरच्या खालीच लावण्यात आलेले डिस्ट्रिब्युशन बॉक्सची (डीबी) दुरूस्ती मागील अनेक वर्षांपासून रखडली होती. अनेक डिस्ट्रिब्युशन बॉक्सचे दरवाजे तुटले असल्याने सदर बॉक्स वर्षभर उघडेच राहत होते. या बॉक्समधील वायर, ग्रिपही अनेक वर्षांपासून बदलविण्यात आले नव्हते. यावर्षी मात्र जिल्हाभरातील सुमारे ५० डिस्ट्रिब्युशन बॉक्सची दुरूस्ती करण्यात आली आहे. तर आणखी २०० बॉक्स दुरूस्त करण्याचे नियोजन वीज विभागाने केले आहे.
प्रत्येक गावाला मुख्य लाईनवरून विद्युत पुरवठा करताना सदर पुरवठा नियंत्रित करण्यासाठी मुख्य लाईनच्या खांबावर ट्रान्सफॉर्मर तसेच डिस्ट्रिब्युशन बॉक्स लावण्यात येतो. ३० ते ४० वर्षांपूर्वी गावांना वीज पुरवठा करण्यात आला. त्याचवेळी डिस्ट्रिब्युशन बॉक्स व ट्रान्सफॉर्मर लावण्यात आले होते. तेव्हापासून केवळ तात्पुरती दुरूस्ती करून काम चालविण्यात येत होते. ट्रान्सफॉर्मर उंचावर राहत असल्याने यापासून जनावरे किंवा मानवाला धोका नसला तरी डिस्ट्रिब्युशन बॉक्स मात्र हात पुरेल एवढ्या उंचावरच ठेवण्यात येते.
विद्युत पुरवठा झाला तेव्हापासून अनेक डिस्ट्रिब्युशन बॉक्सची दुरूस्ती करण्यात आली नव्हती. त्यामुळे पावसाळ्यादरम्यान वेळोवेळी विद्युत पुरवठा खंडित होत होता. सदर डिस्ट्रिब्युशन बॉक्स दुरूस्त करण्याची मागणी ग्रामपंचायत तसेच गावकऱ्यांकडून होत असली तरी वीज विभाग मात्र याकडे दुर्लक्ष करीत होता. यावर्षी पहिल्यांदाच वीज विभागाने मोठ्या प्रमाणात डिस्ट्रिब्युशन बॉक्स दुरूस्तीचे काम हाती घेतले आहे. मुख्य लाईनवरील १५ डिस्ट्रिब्युशन बॉक्स दुरूस्त करण्यात आले आहेत. त्याचबरोबर आरमोरी तालुक्यातील ४ तर देसाईगंज तालुक्यातील ३ डिस्ट्रिब्युशन बॉक्स दुरूस्त करण्यात आले आहेत. त्याचबरोबर आलापल्ली विभागातील २८ बॉक्स दुरूस्त करण्यात आले आहेत. आणखी २०० बॉक्स दुरूस्ती करण्याचे नियोजन वीज विभागाने केले आहे. सदर बॉक्स दुरूस्तीचे कामही सुरू झाले आहे.
डिस्ट्रिब्युशन बॉक्स दुरूस्त करताना विशेष करून जुने वायर बदलविण्यात येत आहेत. त्याचबरोबर ज्या बॉक्सचे दरवाजे तुटले आहेत, ते दरवाजे लावण्याचे काम हाती घेण्यात आले आहेत. डिस्ट्रिब्युशन बॉक्स दुरूस्तीमध्ये गावांबरोबरच शेतकऱ्यांचेही बॉक्स दुरूस्त करण्यात येत आहेत. विशेष करून ग्रामीण व दुर्गम भागातील डीबी दुरूस्तीला प्राधान्य देण्यात आले आहे. इलेक्ट्रिक विभागाने यावेळी २५० डिस्ट्रिब्युशन बॉक्सच्या दुरूस्तीचे काम हाती घेतले असले तरी आणखी अनेक बॉक्सची दुरूस्ती करणे आवश्यक झाले आहे. सदर काम आता पुढील वर्षी हाती घेतले जाण्याची शक्यता आहे. वीज विभागाकडे कमी मनुष्यबळ उपलब्ध असल्याने दुरूस्तीची कामे करण्यात उशिर होत आहे. त्यामुळे २५० पैकी केवळ ५० बॉक्सची दुरूस्ती आजपर्यंत झाली आहे. (नगर प्रतिनिधी)