गडचिरोली : नक्षलवाद्यांच्या टीसीओसी सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर तीव्र करण्यात आलेल्या नक्षलविरोधी अभियानादरम्यान सोमवारी (दि.२९) सकाळी झालेल्या पोलीस-नक्षल चकमकीत पाच नक्षलवादी ठार झाले. त्यात दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीचा मेंबर रूषी रावजी उर्फ पवन उर्फ भास्कर हिचामी (४६ वर्ष) याच्यासह दोन महिला नक्षल्यांचा समावेश आहे. नक्षल नेता भास्करवर २५ लाखांचे तर सर्व मृत नक्षलवाद्यांवर मिळून एकूण ४३ लाखांचे बक्षीस होते. (5 Naxalite killed by C60 Commandoes in Khobramendha Jungle, Malewada, Tal-kurkheda, dist- Gadchiroli)
गडचिरोली परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक संदीप पाटील, पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी सायंकाळी पत्रकार परिषदेत या घटनेची सविस्तर माहिती दिली. कुरखेडा पोलीस उपविभागांतर्गत येणाऱ्या मालेवाडा परिसरातील खोब्रामेंढा जंगलात नक्षलवादी घातपाती कारवायांचा कट रचत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार एएसपी (अभियान) मनिष कलवानिया यांच्या नेतृत्वात अभियान तीव्र करण्यात आले.
शनिवारी झालेल्या चकमकीत पोलिसांच्या सी-६० पथकाने नक्षल्यांचा कट उधळला होता. त्यानंतर सोमवारी सकाळी ६.३० च्या सुमारास जंगलात दबा धरून बसलेल्या ४० ते ५० नक्षलवाद्यांनी सी-६० जवानांच्या दिशेने गोळीबार केला. यावेळी पोलिसांनी प्रत्युत्तर देत स्वसंरक्षणासाठी नक्षल्यांच्या दिशेने गोळीबार केला. दोन ते अडीच तास चाललेल्या या चकमकीनंतर नक्षलवादी जंगलात पसार झाले. घटनास्थळावरून नक्षल्यांकडील एके-४७ रायफल, एक १२ बोअर रायफल आणि एक ३०३ आणि एक ८ एमएम रायफल, एक लॅपटॉप तसेच दैनंदिन वापराचे साहित्य जप्त करण्यात आले.
मृत नक्षलवाद्यांचा अनेक गुन्ह्यात सहभागया चकमकीत ठार झालेला नक्षल नेता भास्कर हिचामी हा टिपागड एलओएस पदावर कार्यरत होता. त्याच्यावर खून, चकमक, दरोडा, जाळपाेळ असे १५५ गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर शासनाने २५ लाखांचे बक्षीस ठेवले होते. स्पेशल झोनल कमिटी मेंबर असलेला नक्षल नेता पहिल्यांदाच पोलिसांच्या गोळीचा शिकार ठरला आहे.
- राजू उर्फ सुखदेव बुधेसिंग नैताम (३२) हा टिपागडचा उपकमांडर होता. त्याच्यावर १४ गुन्हे दाखल असून १० लाखांचे बक्षीस होते. अमर मुया कुंजाम (३०) रा.जागरगुडा, जिल्हा बस्तर (छत्तीसगड) हा या चकमकीत ठार झालेला एकमेव छत्तीसगडी नक्षली आहे. त्याच्यावर ११ गुन्हे असून २ लाखांचे बक्षीस होते.
- दोन महिला नक्षल्यांमध्ये सुजाता उर्फ कमला उर्फ पुनीता गावडे उर्फ आत्राम (३८) ही टिपागड एलओएस प्लाटून क्र.१५ ची सदस्य होती. तिच्यावर ३१ गुन्हे असून ४ लाखांचे बक्षीस होते. अस्मिता उर्फ सुखलू पदा (२८) हिच्यावर ११ गुन्हे दाखल असून तिच्यावर २ लाखांचे बक्षीस ठेवले होते.