पाच लाखांचे बोनस वाटप
By Admin | Updated: May 31, 2015 01:20 IST2015-05-31T01:20:11+5:302015-05-31T01:20:11+5:30
आलापल्ली वन विभागाअंतर्गत येत असलेल्या वनपरिक्षेत्र कार्यालय चामोर्शीतर्फे तेंदूपत्ता मजुरांना ...

पाच लाखांचे बोनस वाटप
चामोर्शी : आलापल्ली वन विभागाअंतर्गत येत असलेल्या वनपरिक्षेत्र कार्यालय चामोर्शीतर्फे तेंदूपत्ता मजुरांना सुमारे चार लाख ९९ हजार ७२९ रूपयांच्या बोनसचे वितरण शुक्रवारी आयोजित कार्यक्रमादरम्यान करण्यात आले.
यावेळी चामोर्शी वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्राधिकारी शंकर गाजलवार, क्षेत्रसहाय्यक आर. के. जल्लेवार, शंकर गुरनुले, वनरक्षक आर. पी. तुडावले, प्रांजय वडेट्टीवार, जे. टी. नीमसरकार, जोशी, पी. बी. आत्राम यांच्यासह वनव्यवस्थापन समित्यांचे पदाधिकारी, गावांमधील सरपंच, उपसरपंच आदी उपस्थित होते.
चामोर्शी वनपरिक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या नारायणपूर, कर्कापल्ली, श्यामनगर, बेलगट्टा, पेटतळा, राजूर, गहुबोडी, जामगिरी या आठ गावांमधील तेंदूपत्ता मजुरांना २०१३ च्या हंगामातील मजुरीची रक्कम देण्यात आली. कर्कापल्ली येथील मजुरांना एक लाख १९ हजार १६९, श्यामनगर येथील मजुरांना एक लाख ४१ हजार ८५२, नारायणपूर येथील मजुरांना ८९ हजार ८८३, बेलगट्टा ६० हजार ९१, जामगिरी ५३ हजार २३४, गहुबोडी ३५ हजार ५०० एवढी रक्कम वितरित करण्यात आली.
तेंदूपत्ता मजुरीचे काम करणारे बहुतांश मजूर अल्पभूधारक शेतकरी आहेत. खरीप हंगामाच्या अगदी तोंडावर तेंदूपत्ता बोनसची रक्कम मिळाल्याने मजुरांनी समाधान व्यक्त केले असून या रकमेतून बी-बियाणे, खते, कीटकनाशके खरेदी केले जाणार आहेत. (शहर प्रतिनिधी)
गहुबोडीतील रक्कम गावविकासासाठी
गहुबोडी येथील तेंदूपत्ता मजुरांना ३५ हजार ५०० रूपयांचे बोनस प्राप्त झाले आहे. या बोनसची रक्कम गावाच्या विकासासाठी वापरण्याचा निर्णय मजुरांनी घेतला आहे. या रकमेतून गावात एखादे लोकोपयोगी बांधकाम किंवा उपक्रम राबविला जाणार असल्याची माहिती वनपरिक्षेत्राधिकारी गाजलवार यांनी दिली.