सव्वा कोटीतून होणार ४९ विहिरी
By Admin | Updated: January 11, 2016 01:19 IST2016-01-11T01:19:26+5:302016-01-11T01:19:26+5:30
नक्षलग्रस्त भागाच्या विकासासाठी विशेष कृती कार्यक्रमांतर्गत सन २०१५-१६ या वर्षात जिल्ह्याच्या नऊ तालुक्याच्या नक्षलग्रस्त...

सव्वा कोटीतून होणार ४९ विहिरी
कामांना मिळाली मंजुरी : नऊ तालुक्यात होणार कामे; नक्षलग्रस्त गावात विशेष उपाययोजना
दिलीप दहेलकर गडचिरोली
नक्षलग्रस्त भागाच्या विकासासाठी विशेष कृती कार्यक्रमांतर्गत सन २०१५-१६ या वर्षात जिल्ह्याच्या नऊ तालुक्याच्या नक्षलग्रस्त गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्यासाठी तब्बल सव्वा कोटी रूपयांच्या ४९ विहिरींच्या कामांना जिल्हा समन्वय समितीने मंजुरी प्रदान केली आहे. जि.प.च्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत जानेवारी अखेरीसपासून सदर मंजूर कामे हाती घेण्यात येणार आहे.
गडचिरोली जिल्हा पोलीस विभागामार्फत वर्षभर पोलीस अधिकारी व कर्मचारी गडचिरोली जिल्ह्याच्या नक्षलग्रस्त गावांना भेटी देतात. या अंतर्गत ग्रामीण भागातील जनतेच्या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्नही पोलीस विभागाकडून केला जातो. ग्रामभेटीदरम्यान पोलीस विभागाच्या अधिकाऱ्यांना अनेक नक्षलग्रस्त गावांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या सोयीसुविधा नसल्याचे दिसून आले. यामुळे या भागातील नागरिकांना उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागतो.
याशिवाय नक्षलग्रस्त जंगली भागात नक्षलविरोधी अभियान राबविणाऱ्या जिल्हा पोलीस व सी-६० जवानांना पाण्यासाठी दाही दिशा फिरावे लागते. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने दरवर्षी नक्षलग्रस्त भागाच्या विकासासाठी कृती कार्यक्रमांतर्गत रस्ते, नाली, पिण्याच्या पाण्याची सोयीसुविधा व इतर विकासकामे जिल्हा प्रशासनाकडे सूचित केले जातात. पोलीस विभागाच्या मागणी नुसार जिल्हा प्रशासनाच्या वतीने नक्षलग्रस्त भागाच्या विकासासाठी कृती कार्यक्रमांतर्गत दरवर्षी लाखो रूपयांची कामे मंजूर केली जातात.
२०१५-१६ या आर्थिक वर्षात नक्षलग्रस्त भागाच्या विकासासाठी विशेष कृती कार्यक्रमांतर्गत नक्षलग्रस्त गावांमध्ये १० पिण्याच्या पाण्याच्या साध्या विहिरींची कामे मंजूर करण्यात आली आहेत. या विहिरींची अंदाजपत्रकीय किमत ८ लाख ५० हजार रूपये आहे. मंजूर झालेल्या १० विहिरींच्या कामांमध्ये कोरची तालुक्यातील छोटा झेलिया, बोटेझरी, कुंभकोट, कुरखेडा तालुक्यातील येंगलखेडा, भामरागड तालुक्यातील कसनासूर, नेलगुंडा, एटापल्ली तालुक्यातील कसनसूर, अहेरी तालुक्यातील बिऱ्हाडघाट व सिरोंचा तालुक्यातील पुल्लीगुड्डम व कोपेला आदींचा समावेश आहे.
नक्षलग्रस्त ३९ गावांमध्ये प्रत्येकी १ लाख रूपयांतून ३९ नवीन विंधन विहिरींचे काम मंजूर करण्यात आले आहे. यामध्ये भामरागड तालुक्यातील भटपार, टेकला, मिडदापल्ली, धानोरा तालुक्यातील कनेरी, मुरगाव, दुर्गापूर, सावंगा, अहेरी तालुक्यातील सिंधा, छल्लेवाडा, व्यंकटापूर, तुमरकसा, झिमेला, सूर्यापल्ली, राजाराम, मद्दीगुड्डम, जिमलगट्टा, कोडसेलगुड्डम, रेपनपल्ली अशा एकूण ११ कामांचा, एटापल्ली तालुक्यातील सेवारी, वांगेझरी, गोरगुट्टा, पिपली, एटावाही, हेडरी, वेरमागड, कसनसूर, भामरागड तालुक्यातील दोबुर, कुचेर, पद्दूर, कोसफुटी टोला या चार, कुरखेडा तालुक्यातील हेटीनगर, गडचिरोली तालुक्यातील जमगाव, मौशीखांब या दोन गावातील कामांचा समावेश आहे.