लोकन्यायालयात ४९ प्रकरणे निकाली
By Admin | Updated: April 9, 2017 01:30 IST2017-04-09T01:30:47+5:302017-04-09T01:30:47+5:30
जिल्ह्यातील सर्व न्यायालयात दाखलपूर्व प्रकरणांकरिता राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते.

लोकन्यायालयात ४९ प्रकरणे निकाली
२३ लाख रूपयांची वसूली : न्यायालय परिसरात नागरिकांची गर्दी
गडचिरोली : जिल्ह्यातील सर्व न्यायालयात दाखलपूर्व प्रकरणांकरिता राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. या लोकअदालतीत ४९ प्रकरणे निकाली काढण्यात आली.
देशातील सर्व न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांची संख्या कमी करण्याकरिता संपूर्ण देशात शनिवारी ८ एप्रिल रोजी राष्ट्रीय लोक महाअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. याची अंमलबजावणी गडचिरोली जिल्ह्यातही करण्यात आली. राष्ट्रीय महालोक न्यायालयात १८ लाख ४५ हजार रूपयांची एकूण १९ प्रलंबित प्रकरणे निकाली काढली. तसेच ४ लाख ६८ हजार ३७३ रूपयांची ३० दाखलपूर्व प्रकरणे निकाली काढली. असे एकूण २३ लाख १३ हजार ३७३ रूपयांची ४९ प्रकरणे निकाली काढले आहेत. प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष यू. एम. पदवाड यांच्या नियंत्रणाखाली दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव ता. के. जगदाळे यांच्या देखरेखीखाली लोक न्यायालयाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा न्यायाधीश वर्ग २ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश सु. तु. सूर यांनी पॅनल क्रमांक १ चे प्रमुख म्हणून काम पाहिले. दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर ता. के. जगदाळे यांनी पॅनल क्रमांक २ चे प्रमुख म्हणून काम पाहिले. सह दिवाणी न्यायाधीश क स्तर तथा न्याय दंडाधिकारी प्रथम श्रेणी सु. म. बोमीडवार यांनी पॅनल क्रमांक ३ चे काम पाहिले. राष्ट्रीय लोकअदालत यशस्वी करण्यासाठी वकील मंडळी, न्यायालयातील कर्मचारी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. महालोक अदालतीत एकाच दिवशी प्रकरणे निकाली काढतात. त्यामुळे वेळ, पैसा, श्रम वाचण्यास मदत होते. ही बाब नागरिकांच्या लक्षात आल्याने महालोक अदालतीत प्रकरणांची संख्या वाढत आहे. (नगर प्रतिनिधी)