४८० नागरिकांची आरोग्य तपासणी
By Admin | Updated: March 9, 2017 01:35 IST2017-03-09T01:35:15+5:302017-03-09T01:35:15+5:30
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत नगर परिषद व जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोलीच्या संयुक्त

४८० नागरिकांची आरोग्य तपासणी
पालिकेतर्फे आरोग्य शिबिर : विविध स्पर्धेतून महिलांनी दाखविले आपले कलाकौशल्य
गडचिरोली : राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत नगर परिषद व जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोलीच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त गोकुलनगर येथील सावित्रीबाई फुले नगर परिषद शाळेच्या प्रांगणात बुधवारी महाआरोग्य शिबिर घेण्यात आले. या शिबिरात महिला, पुरूष, बालके व वृद्ध मिळून एकूण ४८० जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
या शिबिराचे उद्घाटन अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रूडे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष योगीता पिपरे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून न. प. उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती अनिल कुनघाडकर उपस्थित होते. यावेळी मंचावर पालिकेचे मुख्याधिकारी कृष्णा निपाने, नगरसेवक प्रमोद पिपरे, संजय मेश्राम, सतीश विधाते, मुक्तेश्वर काटवे, प्रमोद पिपरे, रंजना गेडाम, रितू कोलते, निमा उंदीरवाडे, वर्षा बट्टे, भूपेश कुळमेथे, प्रवीण वाघरे, रमेश भुरसे, लता लाटकर, वर्षा नैताम, मंजूषा आखाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी नागरिकांची सिकलसेल, एचआयव्ही, ब्लडप्रेशर, मधुमेह, नेत्र तपासणी करण्यात आली. तसेच नाक, कान, घसा व एचआयव्हीचे तपासणी कक्ष लावण्यात आले होते. शिबिरस्थळी गोकुलनगर, फुलेवॉर्ड, आशीर्वाद नगर व इतर वॉर्डातील नागरिकांनी तपासणीसाठी गर्दी केली होती. तपासणीनंतर संबंधित नागरिकांना औषध पुरवठा करण्यात आला. याप्रसंगी नगराध्यक्ष योगीता पिपरे, मुख्याधिकारी निपाने, उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, सभापती अल्का पोहणकर आदींनी महिलांचे आरोग्य, स्वावलंबन व सक्षमीकरणाबाबत मार्गदर्शन केले. संचालन गणेश ठाकूर, प्रास्ताविक कानडे यांनी केले आभार विद्युत पर्यवेक्षक घोसे यांनी मानले. यशस्वीतेसाठी पाणी पुरवठा अभियंता उमेश शेंडे, आरोग्य कर्मचारी प्रणाली दुधबळे, दिलीप संतोषवार, छगन काळबांधे, विशाल गजभिये, गणेश नाईक आदींनी सहकार्य केले. (स्थानिक प्रतिनिधी)