सिरोंचात ४४ महिला उमेदवार
By Admin | Updated: October 25, 2015 01:17 IST2015-10-25T01:17:49+5:302015-10-25T01:17:49+5:30
नगर पंचायत निवडणुकीत एकूण १७ प्रभागांपैकी ११ प्रभागात ४४ महिला उमेदवार आपले भाग्य अजमावित आहेत.

सिरोंचात ४४ महिला उमेदवार
नगर पंचायत निवडणूक : सर्वसाधारण प्रवर्गात काट्याची लढत
सिरोंचा : नगर पंचायत निवडणुकीत एकूण १७ प्रभागांपैकी ११ प्रभागात ४४ महिला उमेदवार आपले भाग्य अजमावित आहेत. एकूण ९२ उमेदवारांपैकी ४८ पुरूष व ४४ महिला उमेदवार रिंगणात आहेत.
प्रभाग क्रमांक १ मध्ये सर्वसाधारण स्त्री राखीव जागेत ४ महिला रिंगणात आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आविसंचे उमेदवार रिंगणात असून त्रिकोणी मुकाबला होण्याची शक्यता आहे. प्रभाग क्र. २ सर्वसाधारण स्त्री प्रवर्गासाठी राखीव असून या ठिकाणी चौरंगी लढत होणार आहे. प्रभाग क्र. ३ अनुसूचित जमातीसाठी राखीव असून या प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेस व आविसंने महिला उमेदवारांना उतरविले आहे. भाजपा, काँग्रेस व शिवसेनेने तीन पुरूष उमेदवारांना उमेदवारी दिली आहे. प्रभाग क्र. ४ अनुसूचित स्त्री प्रवर्गासाठी राखीव आहे. या प्रवर्गात चार महिला उमेदवार रिंगणात आहेत. या प्रभागात काँग्रेसकडून तलांडी रजनी राजेरा, राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे परसा संतोषी श्रीनिवास, भाजपाकडून कुळसंगे सोनल सुभाष, आविसंकडून पंचारिया अंजली लिंगया हे उमेदवार रिंगणात आहेत. प्रभाग क्र. ५ नामाप्र स्त्रीसाठी राखीव आहेत. या ठिकाणी चार महिला रिंगणात आहेत. प्रभाग क्र. ६ नामाप्र स्त्रीसाठी राखीव असून या प्रभागात सहा महिला रिंगणात आहेत. प्रभाग क्र. १० सर्वसाधारण स्त्रीसाठी राखीव आहे. पाच महिला उमेदवार रिंगणात आहेत. प्रभाग क्र. ११ अनुसूचित जाती स्त्रीसाठी राखीव आहे. या प्रभागात चार महिला उमेदवार रिंगणात आहेत. प्रभाग क्र. १२ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. या प्रभागात सात उमेदवार रिंगणात आहेत. काँग्रेसने महिला उमेदवाराला उमेदवारी दिली आहे. इतर सहा उमेदवार पुरूष आहेत. प्रभाग क्र. १३ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. या प्रभागात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बसपा, भाजपा, आविसं असे एकूण पाच उमेदवार रिंगणात आहेत.
प्रभाग क्र. १४ नामाप्र महिलेसाठी राखीव आहे. पाच महिला उमेदवार रिंगणात आहेत. प्रभाग क्र. १५ नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव आहे. या प्रभागातून सहा उमेदवार रिंगणात आहेत. प्रभाग क्र. १६ सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहे. त्यामुळे या प्रभागात फार मोठ्या प्रमाणात चुरस बघायला मिळत आहे. अनेक प्रतिष्ठीत नागरिकांनी या प्रभागातून आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. या प्रभागातून सात उमेदवार रिंगणात आहेत. प्रभाग क्र. १७ सुद्धा सर्वसाधरणसाठी आहे. या प्रभागातून सुमारे ८ उमेदवार रिंगणात आहेत.
नगर पंचायतीची पहिलीच निवडणूक असल्याने मतदार व उमेदवारांमध्ये निवडणुकीविषयी प्रचंड उत्साह आहे. राजकीय पक्षांनीही मोर्चे बांधणी करून चांगले उमेदवार रिंगणात उभे केले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दुसऱ्या दिवसापासूनच प्रचाराला सुरुवात झाली होती. मात्र दसऱ्यापर्यंत पाहिजे त्या प्रमाणात प्रचाराला वेग आला नव्हता. दसऱ्यानंतर मात्र शुक्रवारपासून सर्वच राजकीय पक्ष व उमेदवार प्रचाराला लागले आहेत.
प्रभागाची लोकसंख्या कमी असल्याने ध्वनीक्षेपकाऐवजी प्रत्येक प्रभागात बॅनर बांधणे व घरभेटी घेऊन प्रचार करण्यावर भर दिला जात आहे. पुरूषांसाठी असलेल्या वॉर्डांमध्ये काट्याची लढत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रभागातील लढतीकडे राजकीय पक्ष विशेष लक्ष देत आहेत. (शहर प्रतिनिधी)