४३ हजार मतदार बजावणार मतदानाचा हक्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2017 00:46 IST2017-02-07T00:46:41+5:302017-02-07T00:46:41+5:30
दुसऱ्या टप्प्यात २१ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत सिरोंचा तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतीअंतर्गत तब्बल १३९ गावातील एकूण ४३ हजार २१३ मतदार मतदानाचा हक्क बजाविणार आहेत.

४३ हजार मतदार बजावणार मतदानाचा हक्क
सिरोंचा तालुक्यात ७६ मतदान केंद्र : १३९ गावांचा समावेश; महिलाराज राहणार
सिरोंचा : दुसऱ्या टप्प्यात २१ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत सिरोंचा तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतीअंतर्गत तब्बल १३९ गावातील एकूण ४३ हजार २१३ मतदार मतदानाचा हक्क बजाविणार आहेत.
तालुक्यात निवडणुकीसाठी एकूण ७६ मतदान केंद्र ठेवण्यात आले असून यामध्ये ३६ केंद्र अतिसंवेदनशील आहे. ३० मतदान केंद्र संवेदनशील तर १० मतदान केंद्र साधारण आहे. सिरोंचा येथे नगर पंचायत झाल्यामुळे सिरोंचा रै. व सिरोंचा माल (कोट्टागुडम), सूर्यापल्ली, धर्मपुरी या गावातील मतदार नगर पंचायत क्षेत्रात समाविष्ट झाले आहेत. त्यामुळे येथील मतदारांना या निवडणुकीत मतदान करता येणार आहे. सिरोंचा तालुक्यातील चारही जिल्हा परिषद क्षेत्र महिलांसाठी राखीव आहे. पंचायत समितीच्या आठ गणापैकी चार गण महिलांसाठी राखीव असल्याने सिरोंचा तालुक्यात महिलाराज राहणार आहे.
गडचिरोली जिल्ह्याचा शेवटचा टोक व नक्षल प्रभावित क्षेत्र म्हणून सिरोंचा तालुक्याची ओळख आहे. तालुक्यातील झिंगानूर-आसरअल्ली जि. प. क्षेत्र अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी राखीव आहे. विठ्ठलराव पेठा-जाफ्राबाद जि. प. क्षेत्र अनुसूचित जमातीच्या महिलांसाठीच राखीव आहे. नारायणपूर-जानमपल्ली जि. प. क्षेत्र अनुसूचित जातीच्या महिलांसाठी तर लक्ष्मीदेवी पेठा-अंकिसा जि. प. क्षेत्रात नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलांसाठी राखीव आहे. झिंगानूर पं. स. गण अनुसूचित जमाती महिलांसाठी तर आसरअल्ली, विठ्ठलराव पेठा हे दोन्ही गण याच प्रवर्गातील महिलांसाठी राखीव आहे. जाफ्राबाद पं. स. गणात चार ग्रामपंचायतीचा समावेश असून येथील जागा सर्वसाधारण महिलांसाठी राखीव आहे. नारायणपूर गणाअंतर्गत चार ग्रामपंचायतीतील १६ गावे समाविष्ट असून येथील जागा अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव आहे.
जानमपल्ली गणामध्ये सहा ग्रामपंचायतींचा समावेश असून येथील जागा नामाप्र महिलांसाठी राखीव आहे. लक्ष्मीदेवी पेठा गणात सहा ग्रा. पं. समाविष्ट असून येथील जागा अनुसूचित जाती महिलांसाठी तर अंकिसा गणाची जागा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. या गणात चार ग्रामपंचायतीतील सात गावातील ६ हजार १६३ मतदारांचा समावेश आहे. सिरोंचा तालुक्यात या निवडणुकीत महिला उमेदवारांमध्ये प्रचंड चुरस आहे. (शहर प्रतिनिधी)