ओबीसी युवकांना ४३ लाखांचे कर्ज वाटप

By Admin | Updated: May 8, 2015 01:35 IST2015-05-08T01:35:57+5:302015-05-08T01:35:57+5:30

इतर मागास वर्गीय (ओबीसी) समाजातील युवकांना रोजगारासाठी कर्ज उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या

43 lakhs loan allocated to OBC youth | ओबीसी युवकांना ४३ लाखांचे कर्ज वाटप

ओबीसी युवकांना ४३ लाखांचे कर्ज वाटप

गडचिरोली : इतर मागास वर्गीय (ओबीसी) समाजातील युवकांना रोजगारासाठी कर्ज उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य इतर मागास वर्गीय वित्त आणि विकास महामंडळाने २००४ पासून गडचिरोली जिल्ह्यातील ८९ युवकांना सुमारे ४३ लाख ८० हजार रूपयांच्या कर्जाचे वितरण केले आहे. या कर्जामुळे अनेकांना रोजगार मिळाला आहे.
कोणताही रोजगार करण्यासाठी भांडवलाची नितांत गरज भासते. मात्र भांडवल आणावे कुठून हा सर्वात मोठा प्रश्न आहे. युवकांना भांडवालाची सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य इतर मागास वर्गीय वित्त आणि विकास महामंडळ स्थापन केले असून जिल्हास्तरावर स्वतंत्र कार्यालय स्थापन करण्यात आले आहे. या महामंडळाच्या वतीने बीज भांडवल योजना, थेट कर्ज योजना, सुक्ष्म पत पुरवठा योजना, महिला समृध्दी योजना, स्वर्णीमा योजना, मुदती कर्ज योजना, शैक्षणिक कर्ज योजना, मर्जीन मनी योजना आदी योजनाचा चालविल्या जात असून या योजनांच्या माध्यमातून युवकांना सुटीच्या व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिल्या जाते. गडचिरोली जिल्ह्यासाठी २००४ साली स्वतंत्र कार्यालयाची स्थापना करण्यात आली आहे. २००४ पासून या कार्यालयाने आजपर्यंत सुमारे ८९ युवकांना ४३ लाख ८० हजार रूपयांचे वाटप केले जाते.
बहुतांश कर्ज हे पाच वर्षांच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने भरावे लागते. वाटप केलेल्या एकूण कर्जापैकी सुमारे ४१ लाख रूपयांच्या कर्जाची वसुली झाली असून केवळ अडीच लाख रूपयांचे कर्ज शिल्लक आहे. इतर जिल्ह्याच्या तुलनेत गडचिरोली जिल्ह्यात कर्ज घेण्याचे प्रमाण अत्यंत कमी आहे. इतर जिल्ह्यांमध्ये कर्ज घेण्यासाठी युवकांच्या उड्या पडतात. मात्र गडचिरोली जिल्ह्यात जनजागृती करून कर्ज घेणारे उमेदवार शोधावे लागत आहेत. अशी विपरित परिस्थिती दिसून येते. घेतलेले कर्ज मात्र येथील युवक प्रामाणिकपणे परतफेड करीत असल्याने थकीत कर्जाचे प्रमाण कमी आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, महामंडळ यांच्या वतीने ग्रामीण भागातील युवकांमध्ये कर्ज घेण्याविषयी जनजागृती केली जात आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: 43 lakhs loan allocated to OBC youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.