४३ शेततळे, ७९ बंधारे
By Admin | Updated: September 16, 2014 01:56 IST2014-09-16T01:56:55+5:302014-09-16T01:56:55+5:30
कृषी विभागाच्यावतीने गेल्या दोन वर्षात जिल्ह्यात

४३ शेततळे, ७९ बंधारे
दोन वर्षात : सिंचन सुविधा वाढविण्यास मदत, धान शेतीस उपयोगी
गडचिरोली : कृषी विभागाच्यावतीने गेल्या दोन वर्षात जिल्ह्यात एकूण ४३ शेततळे व ७९ सिमेंट काँक्रीट व मातीचे बंधारे बांधण्यात आले. या शेततळे व बंधाराच्या माध्यमातून शेकडो हेक्टर शेती सिंचनाखाली आली आहे.
राज्य शासनाच्यावतीने जिल्हा कृषी अधीक्षक, कृषी अधिकारी, जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्यावतीने तसेच महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत संपूर्ण राज्यभरात शेततळे व सिमेंट काँक्रीट तसेच मातीचे बंधारे बांधण्याची योजना गेल्या काही वर्षांपासून राबविल्या जात आहे. शेतालगतच्या विहिरीच्या पाण्याच्या पातळी वाढ व्हावी. तसेच पाण्याच्या साठवणूक क्षमतेमध्ये वाढ करण्यासाठी राज्य शासनाने ही महत्वपूर्ण योजना अंमलात आणली. या योजनेची अंमलबजावणी कृषी विभागाच्यावतीने करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत सन २०१२-१३ मध्ये गडचिरोली जिल्ह्यात एकूण तीन शेततळे बांधण्यात आले. तसेच २०१३-१४ मध्ये एकूण ४० शेततळे बांधण्यात आले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत सन २०१२-१३ मध्ये मातीचे १५ व सिमेंट काँक्रीटचे १८ बंधारे असे एकूण २३ बंधारे बांधण्यात आले. सन २०१३-१४ मध्ये या कार्यालयामार्फत मातीचे एकूण ५४ बंधारे बांधण्यात आले तर सिमेंट काँक्रीटचे दोन बंधाऱ्यांचे काम पूर्ण करण्यात आले. दोन्ही वर्षांचे मिळून एकूण ७९ बंधाऱ्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेकडो हेक्टर शेती सिंचनाखाली आणण्यात कृषी विभागाला यश मिळाले आहे.
१९८० च्या वनकायद्याच्या अडथळ्यामुळे जिल्ह्यातील मोठे व लघू सिंचन प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले आहे. १९८० च्या वनकायद्यात शिथीलता आणून जिल्ह्यातील मोठे व लघू सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. मात्र याबाबत शासनाने अद्यापही निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक मोठे व लघूसिंचन प्रकल्प वनकायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत. अशा परिस्थितीत कृषी विभागाच्यावतीने बांधण्यात आलेले शेततळे व सिमेंट काँक्रीट व मातीच्या बंधाऱ्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत जि.पं.च्या कृषी विभागामार्फतही जिल्ह्यात शेततळे व बंधारे बांधण्यात आले आहेत. एका बंधाऱ्याच्या माध्यमातून एक हेक्टर शेती क्षेत्रात सिंचन सुविधा पुरविता येते. एका शेततळ्यापासून दोन एकर क्षेत्रापर्यंत सिंचन व्यवस्थेची सुविधा होते. जिल्ह्यातील आणखी बरेच शेती क्षेत्र सिंचनाखाली येणे बाकी आहे. उर्वरित क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी शेततळे व बंधारे निर्माण करावेत. (स्थानिक प्रतिनिधी)
अनेक बंधाऱ्यांची दूरवस्था
प्रशासनाच्यावतीने काही वर्षांपूर्वी जिल्ह्यात मातीचे तसेच सिमेंट काँक्रीटकरणाचे बंधारे बांधण्यात आले. मात्र या बंधाऱ्यांच्या देखभालीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने जिल्ह्यातील अनेक बंधाऱ्यांची सध्या दूरवस्था झाली आहे. अनेक बंधारे फुटलेल्या अवस्थेत आहेत. अशा बंधाऱ्यांतून पावसाचे पाणी तत्काळ निघून जाते. तसेच जिल्ह्यातील काही बंधारे लिकेज आहेत. या बंधाऱ्यांची दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी शेतकरी गेल्या अनेक वर्षांपासून करीत आहेत. मात्र या बंधाऱ्यांची दुरूस्ती करण्यात आली नाही. निकृष्ठ बांधकाम साहित्यामुळे काही बंधाऱ्यांची दूरवस्था झाली आहे.