४०३ बोड्यांचे नुतनीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2017 00:43 IST2017-05-16T00:43:00+5:302017-05-16T00:43:00+5:30

विदर्भ सधन सिंचन विकास कार्यक्रमांतर्गत गडचिरोली जिल्ह्यात २०१४-१५ ते २०१६-१७ या कालावधीत ४०३ बोड्यांची दुरूस्ती करण्यात आली आहे.

403 bool renovations | ४०३ बोड्यांचे नुतनीकरण

४०३ बोड्यांचे नुतनीकरण

विदर्भ सधन सिंचन विकास निधी : दोन कोटी रूपयांचा झाला खर्च
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : विदर्भ सधन सिंचन विकास कार्यक्रमांतर्गत गडचिरोली जिल्ह्यात २०१४-१५ ते २०१६-१७ या कालावधीत ४०३ बोड्यांची दुरूस्ती करण्यात आली आहे. यावर सुमारे दोन कोटी रूपये खर्च झाले आहेत. यामुळे सिंचनाची सुविधा निर्माण होण्यास मदत झाली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात सुमारे दोन लाख हेक्टरवर धान पिकाची लागवड केली जाते. धान हे गडचिरोली जिल्ह्यातील प्रमुख पीक आहे. धान पिकाला अगदी पऱ्हे टाकण्यापासून तर कापणीपर्यंत मोठ्या प्रमाणात सिंचनाची आवश्यकता भासते. गडचिरोली जिल्ह्यात चामोर्शी तालुक्यातील कन्नमवार जलाशय वगळता एकही मोठा जलसिंचन प्रकल्प नाही. त्यामुळे मामा तलाव किंवा लहान मोठ्या बोड्यांच्या सहाय्याने धान पिकाला सिंचनाची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात बोड्यांना विशेष महत्त्व आहे. ५० वर्षांच्या पूर्वी अनेक बोड्या बांधण्यात आल्या होत्या. काळाच्या ओघात या बोड्यांच्या पाळी खचल्या. तर काही बोड्यांमध्ये गाळ साचल्याने त्यांची पाणी साठवण क्षमता कमालीची घटली. या बोड्यांची दुरूस्ती करणे आवश्यक होते.
विदर्भ सधन विकास कार्यक्रमांतर्गत विदर्भातील जिल्ह्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष निधी उपलब्ध करून दिला जातो. २०१४-१५ पासून प्रत्यक्ष निधी उपलब्ध होण्यास सुरूवात झाली आहे. या निधीतून मार्च २०१७ पर्यंत ४५२ शेततळे, ४०३ बोड्यांची दुरूस्ती करण्यात आली आहे. तीन नाल्यांचे खोलीकरणही करण्यात आले आहे. चार वर्षांच्या कालावधीत गडचिरोली तालुक्यातील ७८, धानोरा तालुक्यातील ४२, चामोर्शी २३, आरमोरी १६, कुरखेडा २९, कोरची ९, एटापल्ली ९९, भामरागड तालुक्यातील १०७ बोड्यांची दुरूस्ती करण्यात आली आहे. त्यावर सुमारे २ कोटी ११ लाख रूपये खर्च झाले आहेत.
विदर्भ सधन सिंचन कार्यक्रमातून प्राप्त झालेला निधी विशेष करून शेततळे व बोड्यांची दुरूस्ती करण्याच्या कामावर खर्च केला जात आहे. त्यामुळे सिंचनाची सुविधा वाढण्यास मदत झाली आहे. अधिकचा निधी देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

१० हेक्टरवर जमिनीचे पुनरूज्जीवन
विदर्भ सधन सिंचन विकास कार्यक्रमांतर्गत प्रामुख्याने सिंचनाची कामे केली जातात. त्याचबरोबर या निधीतून १० हेक्टर जमिनीचे पुनरूज्जीवन करण्यात आले आहे. धानाची शेती करण्यासाठी खाचर (धानाची बांधी) तयार करणे आवश्यक आहे. गरीब शेतकरी खाचर तयार करू शकत नाही. अशा शेतकऱ्यांना विदर्भ सधन सिंचन विकास कार्यक्रमातून भात खाचर तयार करून देण्यात आले आहे.

४५२ शेततळे खोदले
आकस्मिक स्थितीत धान पिकाला सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शेतकऱ्यांना शेततळे सुध्दा खोदून देण्यात आले आहेत. विदर्भ सधन सिंचन विकास कार्यक्रमाच्या निधीतून सुमारे ४५२ शेततळे तीन वर्षांच्या कालावधीत खोदण्यात आले आहेत. गडचिरोली तालुक्यात १२६, धानोरा १९२, चामोर्शी ४७, मुलचेरा २०, आरमोरी २४, कुरखेडा २८, कोरची तालुक्यात १५ शेततळे खोदण्यात आली आहेत.

Web Title: 403 bool renovations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.