आचारसंहितेचे ३९ गुन्हे
By Admin | Updated: October 13, 2014 23:21 IST2014-10-13T23:21:31+5:302014-10-13T23:21:31+5:30
विधानसभेच्या निवडणूक जाहीर झाल्यानंतर आतापर्यंत जिल्ह्यात आचारसंहिता उल्लंघनाचे ३९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याशिवाय निवडणुकीसंबंधी इतर ९ गुन्हेही दाखल झाल्याची माहिती

आचारसंहितेचे ३९ गुन्हे
सर्वाधिक गुन्हे गोंदियात : आठ लाखांची दारू जप्त
गोंदिया : विधानसभेच्या निवडणूक जाहीर झाल्यानंतर आतापर्यंत जिल्ह्यात आचारसंहिता उल्लंघनाचे ३९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याशिवाय निवडणुकीसंबंधी इतर ९ गुन्हेही दाखल झाल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.अमित सैनी यांनी दिली.
निवडणूक तयारीसंबंधी जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी सायंकाळी पत्रपरिषदेत सविस्तर माहिती दिली. यावेळी पोलीस अधीक्षक शशीकुमार मिना, उपजिल्हा निवडणूक अधिकारी लोणकर, उत्पादन शुल्क अधीक्षक धार्मिक, जिल्हा कोषागार अधिकारी नेमाडे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे प्रामुख्याने उपस्थित होते.
विधानसभा निवडणुकीच्या काळात अवैध मद्याच्या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार संघात विविध ठिकाणी धाडसत्र राबविले. विधानसभेची आचारसंहिता लागू झाल्यापासून विभागाने एकूण ११० ठिकाणी धाडी घातल्या असून महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत १०५ गुन्हे नोंदवून ६७ आरोपींना अटक केली आहे. विभागाने आतापर्यंत १९१ लीटर देशी दारू, ४१ लीटर विदेशी दारू, ११४८ लीटर मोह दारू, २९ हजार ५०० लीटर मोहा सडवा, ६० किलो गूळ, १८० किलो मोहफुले व इतर साहीत्य असा एकूण सात लाख ९१ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
जिल्ह्यातील ठोक विदेशी व देशी मद्य विक्रेत्यांकडून किरकोळ मद्य परवानाधारकांना होणाऱ्या मद्याच्या वितरणावर राज्य उत्पादन शुल्क विभाग सर्व परवानाधारकांकडून मद्याची सुरूवातीची शिल्लक, आवक, विक्री व अखेरच्या शिल्लकेची माहिती दररोज मागविण्यात येत आहे. तसेच मद्य दुकानांच्या कामकाजाच्या वेळाही काटेकोरपणे पाळल्या जात असल्याची तपासणी केली जात आहे.
गोंदिया जिल्ह्याची सीमा बालाघाट (मध्य प्रदेश) व राजनांदगाव (छत्तीसगढ) या जिल्ह्यांशी जोडली गेली असल्याने परराज्यातून अवैधरित्या मद्याची आवक होऊ नये याकरिता स्थायी सीमा तपासणी नाका कार्यरत असून सतोना (ता.गोदिया), घाटटेमनी (ता.आमगाव), बोंडराणी (ता.तिरोडा)
व वाघ नदीच्या पुलाजवळ (ता.आमगाव) टेहळणी पथके कार्यरत आहेत. विधानसभा निवडणूक खुल्या व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १३ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजतापासून १४ आॅक्टोबर रोजी पूर्ण दिवस व १५ आॅक्टोबर रोजी म्हणजेच मतदानाचा संपूर्ण दिवस जिल्ह्यातील सर्व देशी, विदेशी, बिअर इत्यादी सर्व परवानाधारक दुकाने बंद ठेवली जाणार आहे. या कालावधीत विभागाने विशेष पथके तयार केली आहे. या पथकांकडून अवैधरित्या मद्य निर्मिती विक्री वाहतूक व वितरण इत्याही गैरप्रकारांवर प्रभावीपणे दिवस रात्र गस्त घालून कारवाई केली जात आहे.