३६७ गावांना दुष्काळी मदत

By Admin | Updated: January 18, 2016 01:27 IST2016-01-18T01:27:52+5:302016-01-18T01:27:52+5:30

२०१५ च्या खरीप हंगामातील धान पिकाचे अपुऱ्या पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यात मोठे नुकसान झाले.

367 villages provide drought assistance | ३६७ गावांना दुष्काळी मदत

३६७ गावांना दुष्काळी मदत

पहिल्या टप्प्यात : १३ कोटी ९२ लाख रूपये तहसीलदारांकडे वर्ग
दिलीप दहेलकर गडचिरोली
२०१५ च्या खरीप हंगामातील धान पिकाचे अपुऱ्या पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यात मोठे नुकसान झाले. अवर्षणामुळे बाधित शेतकऱ्यांची जिल्ह्यात मोठी संख्या आहे. मात्र जिल्हा प्रशासनाने आॅक्टोबरमध्ये घोषित केलेल्या नजर अंदाज आकडेवारीत ५० पैसेपेक्षा कमी पैसेवारी आढळून आलेल्या सहा तालुक्यातील केवळ ३६७ गावातील बाधित शेतकऱ्यांसाठी १३ कोटी ९२ लाख रूपये पहिल्या टप्प्यात तहसीलदारांकडे वर्ग करण्यात आले आहेत.

गडचिरोली जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी राज्य शासनाने २५ कोटी मंजूर केले आहेत. यापैकी शासनाने जिल्हा प्रशासनाला पहिल्या टप्प्यात १४ कोटी ३६ लाखांचा निधी गडचिरोली जिल्ह्यासाठी दिला आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने सदर निधी शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी शासनस्तरावरून मार्गदर्शन मागविण्यात आले होते. शासनाच्या महसूल व वन विभागाच्या १३ मे २०१५ च्या परिपत्रकानुसार ३६७ गावातील बाधित शेतकऱ्यांना सदर दुष्काळी मदत देण्यात येणार आहे.
गडचिरोली तालुक्यात एकूण १२७ गावे आहेत. या तालुक्यातील सर्वच १२७ गावे नजर अंदाज पैसेवारीनुसार दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले आहे. या तालुक्यातील १८ हजार बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने गडचिरोलीच्या तहसील कार्यालयाकडे ६ कोटी २१ लाख रूपये वर्ग केले आहेत.
धानोरा तालुक्याला ६ कोटी ३० लाख रूपये वर्ग करण्यात आले असून सदर रक्कम २१६ गावातील बाधित शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे. मुलचेरा तालुक्यात १२ गावातील ४५० बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी ४० लाख रूपये तहसील कार्यालयाकडे वर्ग करण्यात आले आहे.
अहेरी तालुक्यातील सहा गावातील जवळपास ३०० बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी २३ लाख रूपये तहसील कार्यालयाकडे वर्ग करण्यात आले आहे. सिरोंचा तालुक्यातील चार गावातील शेतकऱ्यांसाठी नऊ लाख तर कुरखेडा तालुक्यातील दोन गावातील शेतकऱ्यांसाठी नऊ लाख रूपये तहसील कार्यालयाकडे वर्ग करण्यात आले आहेत.
संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे. मात्र शासनाने पहिल्या टप्प्यात अत्यल्प निधी दिल्यामुळे केवळ ३६७ गावातील बाधित शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत देण्यात आली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात एकूण १ हजार ६८८ गावे आहेत. सध्या तरी १ हजार ३२१ गावे दुष्काळी मदतीपासून दूर असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: 367 villages provide drought assistance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.