३६४ शाळांमध्ये वीज नाही

By Admin | Updated: May 11, 2017 01:52 IST2017-05-11T01:52:39+5:302017-05-11T01:52:39+5:30

जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात जिल्हा परिषदेच्या एकूण १ हजार ५५० शाळा आहेत.

364 schools do not have electricity | ३६४ शाळांमध्ये वीज नाही

३६४ शाळांमध्ये वीज नाही

प्रशासनाचे दुर्लक्ष : दुर्गम भागातील शाळांमध्ये पायाभूत सोईसुविधांचा अभाव
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात जिल्हा परिषदेच्या एकूण १ हजार ५५० शाळा आहेत. यापैकी ग्रामीण व दुर्गम भागातील ३६४ शाळांमध्ये विद्युतीकरणाचा अभाव आहे. परिणामी या शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षकांना विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यासाठी अडचण जाणवत आहे.
जिल्हा परिषदेच्या १ हजार ५५० प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये चार हजारवर शिक्षक कार्यरत आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी भौतिक सुविधा असणे आवश्यक आहे. मात्र अनेक शाळांमध्ये शौचालय, प्रसाधनगृह, संरक्षण भिंत तसेच विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मैदानाची सुविधा नाही. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा दिवसेंदिवस खालावत चालला आहे. अद्यापही विद्युतीकरणाची सोय न झालेल्या ३६४ शाळांमध्ये गडचिरोली तालुक्यातील आठ, आरमोरी तालुक्यातील आठ, कुरखेडा सात, धानोरा ३१, चामोर्शी १२, अहेरी ७८, एटापल्ली ७६, सिरोंचा ५३, मुलचेरा ९, कोरची २७ व भामरागड ५५ जिल्हा परिषद शाळांचा समावेश आहे. सांस्कृतिक कार्यक्रम व विविध स्पर्धांचा सराव करण्यासाठी शाळेमध्ये विद्युतीकरण असणे आवश्यक आहे. मात्र ३६४ शाळांमध्ये विद्युतीकरण नसल्याने लाऊडस्पीकर लावता येत नाही. परिणामी दिवसाच सांस्कृतिक कार्यक्रम उरकून घ्यावे लागतात. विद्यमान राज्य सरकारच्या शैक्षणिक धोरणानुसार शाळेमधील परिपाठ हा लाऊडस्पीकरच्या सहाय्याने घ्यावयाचा आहे. मात्र विद्युतीकरण न झालेल्या शाळांमध्ये परिपाठ पूर्वीसारखाच लाऊडस्पीकरशिवाय घेतला जात आहे.
एकूण १ हजार ५५० जि.प. शाळांपैकी ९७२ शाळांमध्ये मुख्याध्यापकांसाठी स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात आले आहे. तब्बल ५७८ शाळांमध्ये मुख्याध्यापकांसाठी स्वतंत्र कक्षाची सुविधा नाही. त्यामुळे या शाळांमधील मुख्याध्यापक वर्गखोलीतच बसून शाळेतील प्रशासकीय कामकाज सांभाळत असल्याचे चित्र सर्वत्र आहे.

२७० शाळा संरक्षण भिंतीविना
गडचिरोली जिल्हा परिषद अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या जिल्ह्यातील एकूण २७० प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांना अद्यापही संरक्षण भिंती उभारण्यात आल्या नाही. त्यामुळे या शाळांच्या परिसरात दिवसा व रात्री मोकाट जनावरे प्रवेश करतात. विद्यार्थीही असुरक्षित राहतात. संरक्षण भिंत नसलेल्या शाळांमध्ये गडचिरोली तालुक्यातील ९, आरमोरी ९, कुरखेडा १७, धानोरा ३६, चामोर्शी ३६, अहेरी ५१, एटापल्ली २८, सिरोंचा २०, मुलचेरा ७, कोरची २२ व भामरागड तालुक्यातील ३५ शाळांचा समावेश आहे.

Web Title: 364 schools do not have electricity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.