३६ ग्रामसभा करणार बांबू कापणी व विक्री
By Admin | Updated: May 14, 2015 01:09 IST2015-05-14T01:09:38+5:302015-05-14T01:09:38+5:30
राज्य शासनाने पेसा क्षेत्रातील बांबूची कापणी व विक्री करण्याचा अधिकार ग्रामसभांना प्रदान केला आहे.

३६ ग्रामसभा करणार बांबू कापणी व विक्री
गडचिरोली : राज्य शासनाने पेसा क्षेत्रातील बांबूची कापणी व विक्री करण्याचा अधिकार ग्रामसभांना प्रदान केला आहे. आतापर्यंत बाराही तालुक्यातील ३६ ग्रामसभांचे ठरावासह प्रस्ताव जि. प. प्रशासनाला प्राप्त झाले असल्याने चालू वर्षात जिल्ह्यातील ३६ ग्रामसभा बांबूंची कापणी व विक्री करणार आहे.
राज्याच्या ग्रामविकास विभागाने ३१ मार्च २०१५ रोजी शासन निर्णय निर्गमित करून पेसा क्षेत्रातील ग्रामसभांना बांबूच्या कापणी व विक्रीचा अधिकार बहाल केला. गडचिरोली जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील १३०० गावातील ग्रामसभांना बांबू कापणी व विक्रीबाबतचे व्यवस्थापन करण्याची संधी या निर्णयामुळे मिळाली. अनुसूचित (पेसा) क्षेत्रातील आदिवासींच्या हिताच्या व कल्याणाच्या दृष्टीने राज्यपालांनी १९ आॅगस्ट २०१४ रोजी घेतलेल्या अधिसूचनेअन्वये महाराष्ट्र वन उत्पादन अधिनियम १९९७ मध्ये सुधारणा करण्यात आली. यानुसार अनुसूचित क्षेत्रात गौण वन उपजाच्या व्याख्येमध्ये सुधारणा केली आहे. यामध्ये बांबूचा समावेश करण्यात आला आहे. शासन निर्णयानंतर जिल्हा परिषदेने पेसा क्षेत्रातील ग्राम पंचायतीच्या गावात बांबू कापणी व विक्रीबाबतच्या व्यवस्थापनासंदर्भात जनजागृती केली. त्यानंतर ग्रामसभेच्या ठरावासह इच्छुक ग्रामसभांकडून ठराव मागितले. गडचिरोली जिल्ह्यात पेसा क्षेत्रातील बांबूचे उत्पादन होणारी एकूण १४२ गावे आहेत. यापैकी चार गावात लोकवस्ती नाही. ३६ गावांमध्ये ग्रामसभांमार्फत बांबूची कापणी व विक्रीबाबतचे व्यवस्थापन करण्यात येणार आहे. तर ९० गावात बांबू विक्रीबाबतचे व्यवस्थापन वन विभागाच्या माध्यमातून होणार आहे. बांबू व्यवस्थापनाबाबत पेसा क्षेत्रातील १२ गावांचे प्रस्ताव जि. प. प्रशासनाला प्राप्त झाले नसल्याची माहिती प्रशासकीय सुत्रांकडून मिळाली आहे. बांबू कापणी व विक्रीचे व्यवस्थापन करणाऱ्या ग्रामसभांमध्ये गडचिरोली पं. स. तील दोन, कुरखेडा पं. स. तील एक, कोरची पं. स. तील चार, एटापल्ली पं. स. तील ११, धानोरा पं. स. तील १८ ग्रामसभा बांबू व्यवस्थापनाचे काम करणार आहेत. त्यामुळे या गावात समृद्धी नांदेल. (स्थानिक प्रतिनिधी)
जिल्हास्तरीय तक्रार निवारण समिती
बांबू कापणी व विक्रीसंदर्भात जिल्हास्तरीय मार्गदर्शन तक्रार निवारण समिती गठित करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी तर सहअध्यक्ष म्हणून मुख्य वन संरक्षक आहेत. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी व उपवन संरक्षक हे समितीमध्ये सदस्य म्हणून आहेत. बांबू कापणी व विक्रीसंदर्भात सदर समितीचे सदस्य ग्रामसभांना वेळोवेळी मार्गदर्शन करीत आहेत.
ग्रा. पं. च्या बँक खात्यात रक्कम होईल जमा
पेसा क्षेत्रातील बांबूचे उत्पादन होणाऱ्या गावातील बांबूची कापणी व विक्री संदर्भात व्यवस्थापन करण्याचे काम ३६ ग्रामसभा करणार आहेत. बांबू कापणी व विक्रीतून थेट संबंधित ग्राम पंचायतीच्या बँक खात्यात नफ्याची रक्कम जमा होणार आहे.
हे आहेत बांबू विक्री व व्यवस्थापन करणारी गावे
जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील बांबूचे उत्पादन असलेल्या गावातील ३६ ग्रामसभा बांबू विक्री व व्यवस्थापनाचे काम करणार आहेत. यामध्ये एटापल्ली तालुक्यातील गर्दापल्ली (रेकनार), देवपाडा, मोहदी, वटेली, गोरगट्टा, कर्जमर्का, गुलगुड्डा, एडसगोंदी, कोरची तालुक्यातील गाडेरी, जकारगोंदी, एडजाल, टेमली, धानोरा तालुक्यातील तुडमेड, सराडा, कवडीकसा, चारवाही, गोगाटोला, लहान झेलिया, सायगाव, इरूपधोडरी, हिपानेर, पदाबोरीया, काकडयेली, कन्हाळगाव, रेखाटोला, बद्दूर, येनगाव, येडंपायली, येडेकसा, कुरखेडा तालुक्यातील शिवणी व गडचिरोली तालुक्यातील नागवेली व जल्लेर आदी गावांचा समावेश आहे.