तीन क्षेत्रात ३६ उमेदवार रिंगणात
By Admin | Updated: October 1, 2014 23:22 IST2014-10-01T23:22:14+5:302014-10-01T23:22:14+5:30
अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या ६७ आरमोरी, ६८ गडचिरोली व ६९ अहेरी विधानसभा मतदार संघात आता ३६ उमेदवार मैदानात राहणार आहेत. आज गुरूवारी १२ उमेदवारांनी आपले उमेदवारी

तीन क्षेत्रात ३६ उमेदवार रिंगणात
१२ जणांनी घेतली माघार : सर्वाधिक १४ आरमोरीत, १३ गडचिरोलीत व ९ जण अहेरीत
गडचिरोली : अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या ६७ आरमोरी, ६८ गडचिरोली व ६९ अहेरी विधानसभा मतदार संघात आता ३६ उमेदवार मैदानात राहणार आहेत. आज गुरूवारी १२ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर जिल्ह्यातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. सर्वाधिक १४ उमेदवार आरमोरी विधानसभा क्षेत्रात मैदानात असून १३ उमेदवार गडचिरोलीत व ९ उमेदवार अहेरी विधानसभा क्षेत्रात भाग्य आजमाविणार आहे.
आज १२ उमेदवारांनी आपले नामांकन पत्र मागे घेतले. आरमोरी विधानसभा मतदार संघात उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्यांमध्ये योगेश नामदेव गोन्नाडे, छगन पुणाजी शेडमाके, रामसुराम विश्राम काटेंगे व जयदेव हरेश्वर मानकर यांचा समावेश आहे. तर गडचिरोली विधानसभा मतदार संघात ७ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहे. यामध्ये विद्यमान काँग्रेस आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी यांनी अपक्षरीत्या भरलेला अर्ज आज मागे घेतला. याशिवाय गोपाल लक्ष्मण उईके, शंभुविधी देवीदास गेडाम, वासुदेव किसनजी शेडमाके, भूपेश उमाशंकर कुळमेथे, पुरूषोत्तम श्रावण गायकवाड, हरिशचंद्र नागोजी मंगाम यांचा समावेश आहे. तर अहेरी विधानसभा क्षेत्रात मुतन्ना भीमय्या पेंदाम या एकमेव उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतला. त्यामुळे आता एकूण ३६ उमेदवार तीन मतदार संघात रिंगणात आहेत.
जिल्ह्यात खरी लढत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व शिवसेना या प्रमुख राजकीय पक्षांमध्ये आहे. मात्र अहेरी विधानसभा क्षेत्रात तिरंगी लढत होण्याची चिन्ह आहे. येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, नाविस-भाजप आघाडी व अपक्ष दीपक आत्राम यांच्यात थेट सामना रंगणार आहे. जिल्ह्यात ७ लाख ३१ हजार १०५ मतदार ३६ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला १५ आॅक्टोबर रोजी करणार आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात १६ हजार ७६२ मतदारांची नव्याने भर पडली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)