३५६ शाळा विद्युतीकरणापासून दूर
By Admin | Updated: April 28, 2016 00:59 IST2016-04-28T00:59:54+5:302016-04-28T00:59:54+5:30
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत राज्याचा शालेय शिक्षण विभाग गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा परिषद, ....

३५६ शाळा विद्युतीकरणापासून दूर
जि. प. व न. प. शाळांची स्थिती : सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी भाड्याने घ्यावी लागते वीज
दिलीप दहेलकर गडचिरोली
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत राज्याचा शालेय शिक्षण विभाग गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा परिषद, नगर परिषद व खासगी व्यवस्थापनांच्या शाळांना तंत्रस्रेही शाळा बनविण्याचे स्वप्न पाहत आहे. मात्र नक्षलग्रस्त आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील तब्बल ३५६ शाळांमध्ये विद्युतीकरणाचा अभाव आहे. परिणामी सांस्कृतिक तसेच विविध कार्यक्रमांसाठी शाळांच्या मुख्याध्यापकांना लगतच्या घरातून भाड्याने वीज घ्यावी लागत आहे. विजेअभावी अनेक अडचणी जाणवत आहेत.
गडचिरोली जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात जिल्हा परिषदेच्या १ हजार ५५३ व नगर परिषदेच्या १८ अशा एकूण १ हजार ५७१ प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आहेत. यामध्ये जि. प. च्या १ हजार ५३८ प्राथमिक व उच्च प्राथमिक, माध्यमिक १० तसेच ५ कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय आहेत. गडचिरोली, देसाईगंज नगर पालिकेच्या एकूण १८ शाळांपैकी ५ शाळांमध्ये उच्च प्राथमिक वर्गाच्या शिक्षणाची सुविधा आहे. जिल्हा परिषद व नगर पालिकेच्या एकूण १५७१ पैकी १ हजार २१५ शाळांमध्ये विद्युतीकरणाची सुविधा आहे. तर ३५६ शाळा अद्यापही विद्युतीकरणापासून दूर आहेत.
राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीने शाळा उघडल्यानंतर सकाळची प्रार्थना, पसायदान व दैनंदिन परिपाठ घेण्यासाठी लाऊडस्पिकरचा वापर करण्यात यावा, अशा सूचना आहेत. ज्या शाळांमध्ये विद्युतीकरणाची सुविधा आहे, अशा शाळांनी लाऊडस्पिकर व साऊंड सिस्टीमची व्यवस्था केली आहे. मात्र वीज नसलेल्या तब्बल ३५६ शाळांमध्ये विना लाऊडस्पिकरच्या सहाय्याने सकाळचा परिपाठ घेतल्या जात आहे. वीज नसलेल्या शाळांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाची तयारी व सराव करण्यासाठी शिक्षकांच्या भ्रमणध्वनी संचाचा वापर केला जात आहे. गडचिरोली जिल्हा परिषदेने शाळा विद्युतीकरणासाठी विशेष आर्थिक तरतूद करून जिल्ह्यातील सर्व शाळा विद्युतीकरणातून सोयीसुविधायुक्त कराव्यात, अशी मागणी शिक्षक व पालकांकडून होत आहे.
वर्ग खोल्यांचीही कमतरता
जिल्ह्यात जिल्हा परिषद व नगर परिषदेच्या एकूण १ हजार ५७१ शाळा आहेत. या सर्वच शाळांना इमारती आहेत. मात्र या सर्व शाळा मिळून वर्ग खोल्यांची संख्या १ हजार ३४९ आहे. तब्बल २२२ वर्ग खोल्या शाळांच्या संख्येच्या तुलनेत कमी पडत आहे. या शाळांना तत्काळ स्वतंत्र वर्ग खोल्या निर्माण करण्याची आवश्यकता आहे.
दुर्गम भागातील शाळांकडे दुर्लक्ष
अद्यापही विद्युतीकरण न झालेल्या ३५६ शाळांमध्ये सर्वाधिक धानोरा, अहेरी, एटापल्ली, सिरोंचा, कोरची व भामरागड तालुक्यातील शाळांचा समावेश आहे. शहरी भागालगतच्या शाळांकडे विशेष लक्ष शिक्षण विभागाच्या वतीने दिले जात आहे. मात्र आदिवासीबहुल दुर्गम भागातील शाळांच्या सोयीसुविधा व शैक्षणिक विकासाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. दुर्गम भागातील शाळांकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.