गडचिरोलीच्या तलावात ३५ क्विंटल माश्यांचा मृत्यू
By Admin | Updated: July 2, 2015 02:07 IST2015-07-02T02:07:12+5:302015-07-02T02:07:12+5:30
येथील तलावातील दूषित पाण्यामुळे ३० ते ३५ क्विंटल माशांचा मृत्यू झाल्याची घटना उजेडात आली आहे.

गडचिरोलीच्या तलावात ३५ क्विंटल माश्यांचा मृत्यू
गडचिरोली : येथील तलावातील दूषित पाण्यामुळे ३० ते ३५ क्विंटल माशांचा मृत्यू झाल्याची घटना उजेडात आली आहे. यामुळे संबंधित मत्स्य सहकारी संस्थेचे सुमारे साडेतीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
गडचिरोली येथील फुटक्या देवळाच्या दक्षिणेस मोठा तलाव असून, गोकुळनगरापर्यंत या तलावाचा विस्तार आहे. लघुपाटबंधारे विभागाच्या अखत्यारित या तलावाचा समावेश होतो. काही मत्स्य सहकारी संस्था मासेमारीसाठी हा तलाव पाटबंधारे विभागाकडून लीजवर घेत असतात. यंदा हा तलाव वाल्मिकी मच्छिमार सहकारी संस्थेकडे आहे. या संस्थेने तलावात मागच्या वर्षी सोडलेले मत्स्यबीज मोठे झाले असून, माशांची विक्री केली जात आहे. परंतु मंगळवारपासून शेकडो मासे पाण्यावर तरंगताना आढळून येत आहेत. याशिवाय कित्येक क्विंटल मासे तळाशी आहेत. दूषित पाण्यामुळे या माशांचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पाटबंधारे विभागाने या तलावातील गाळ उपसलेला नाही. शिवाय मलमूत्र आणि पानवनस्पतीच्या कुजण्यामुळेही तलावाचे पाणी दूषित झाले आहे. परिणामी शेकडो माशांचा मृत्यू झाला. रोहू, कतला, म्रिगल, सिप्रिनस, ग्रासकार्प असे अनेक प्रजातींचे मासे या तलावात सोडले होते. अनेक मासे तीन ते चार किलो वजनाचे होते. परंतु दूषित पाण्यामुळे ते मृत्यूमुखी पडल्याने वाल्मिकी मच्छिमार सहकारी संस्थेला मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला आहे.
विशेष म्हणजे, गेल्या चार ते पाच वर्षांपासून या तलावाच्या सौंदर्यीकरणाचे काम सुरु आहे. परंतु ते अद्याप पूर्ण झालेले नाही. या कामामुळे तसेच काही नागरिकांनी तलावाशेजारी अतिक्रमण करुन घरे बांधल्याने या तलावातील पाणी बाहेर जाण्यास मार्गच उरलेला नाही. परिणामी पाणी दूषित झाले.