जिल्ह्यात ३४५ नव्या गावांचा होणार उदय
By Admin | Updated: July 5, 2014 23:33 IST2014-07-05T23:33:55+5:302014-07-05T23:33:55+5:30
जिल्ह्यातील अनेक वस्त्या पेसा, अनुसूचित विस्तार कार्यक्रम कार्यक्षेत्राच्या वसाहतीत येतात. या वस्त्या, वाड्या व टोल्यांना स्वतंत्र गावाचा दर्जा देण्याचे आदेश राज्याच्या ग्राम विकास

जिल्ह्यात ३४५ नव्या गावांचा होणार उदय
पेसा कायदा : वाड्या, वस्त्या व टोल्यांना मिळणार स्वतंत्र ओळख
दिलीप दहेलकर -गडचिरोली
जिल्ह्यातील अनेक वस्त्या पेसा, अनुसूचित विस्तार कार्यक्रम कार्यक्षेत्राच्या वसाहतीत येतात. या वस्त्या, वाड्या व टोल्यांना स्वतंत्र गावाचा दर्जा देण्याचे आदेश राज्याच्या ग्राम विकास विभागाने दिले आहे. यानुसार जिल्हा परिषद प्रशासनाने या कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यानुसार जिल्ह्यामध्ये एकूण ३४५ नव्या गावांचा उदय होणार असून या गावांना स्वतंत्र ओळखही मिळणार आहे.
४ मार्च २०१४ च्या शासनाच्या अधिसूचनेनुसार जि.प.च्या पंचायत विभागाने या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी महिनाभरापूर्वी जिल्हा परिषदेत बैठक बोलाविली. तसेच ग्रामसभेचे प्रस्तावही मागितले. सद्य:स्थितीत जिल्हा परिषदेकडे ११ तालुक्यातील ३४५ पैकी एकूण २९२ प्रस्ताव प्राप्त झाले आहे. यात गडचिरोली ३, आरमोरी १५, कुरखेडा ४३, धानोरा ४९, चामोर्शी १५, अहेरी ०, एटापल्ली ११२, कोरची २५ व मुलचेरा तालुक्यातील १२, भामरागड १२, सिरोंचा तालुक्यातील ६ ग्रामसभेच्या प्रस्तावांचा समावेश आहे. ग्रामसभेची मंजुरी एकूण मतदाराच्या ५० टक्के उपस्थितीत वाड्या, वस्त्या व टोल्यांना गावांचा दर्जा देण्यासाठी पेसा कायद्यांतर्गत आवश्यक आहे. जि.प.ने सदर प्रस्ताव संवर्ग विकास अधिकाऱ्यांमार्फत उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठविले. या प्रस्तावाला अंतिम मंजुरी जिल्हाधिकारी देतात. जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीनंतर वाड्या व वस्त्यांना स्वतंत्र गावांचा दर्जा मिळणार आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील ३४५ वस्त्या, वाड्या व टोल्यांना गावाचा दर्जा मिळण्यासाठी जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. उर्वरित ५३ ग्रामसभेचे प्रस्ताव तत्काळ सादर करण्याचे निर्देश सीईओंनी दिले.
गावांची संख्या वाढणार
जिल्ह्यात एकूण ४६७ ग्रामपंचायती आहे. या ग्रामपंचायतींतर्गत एकूण १ हजार ६८१ गावे आहेत. आता ३४५ वाड्या, वस्त्या व टोल्यांना पेसा कायद्यांतर्गत स्वतंत्र गावांचा दर्जा मिळणार आहे. यामुळे जिल्ह्यातील गावांची एकूण संख्या २ हजार २६ पर्यंत पोहोचणार आहे. पेसा कायद्याने आदिवासी वसाहतींना विशेष अधिकार दिले आहे. यामुळे जिल्ह्यात नव्या गावांची निर्मिती होणार आहे. पेसा कायद्यांतर्गत सर्वाधिक एटापल्ली तालुक्यात ११२ वाड्या, वस्त्या, टोल्यांना स्वतंत्र गावांचा दर्जा मिळणार आहे. या कामी जिल्हा परिषद प्रशासन झपाट्याने लागले आहे.
नव्या गावांचा विकास होणार
पेसा कायद्यांतर्गत जिल्ह्यात एकूण ३४५ वाड्या, वस्त्या व टोल्यांना स्वतंत्र गावांचा दर्जा मिळणार आहे. या वाड्या, वस्त्या व टोल्यातील नागरिकांना राज्य घटनेनुसार मतदानाचा अधिकार मिळाला आहे. मात्र गावांचा दर्जा मिळाला नसल्याने संबंधित ग्रामपंचायत या वाड्या, वस्त्या व टोल्यांचा विकास करण्याकडे दुर्लक्ष करते. त्यामुळे या वाड्या, वस्त्या व टोल्यांमध्ये अद्यापही अनेक मुलभूत समस्या कायम आहेत. सदर वस्त्या मुलभूत सोयीसुविधांपासून वंचित आहे. या वस्त्यांना पेसा कायद्यांतर्गत गावांचा दर्जा मिळाल्यानंतर शासनाचा निधी प्राप्त होऊन विकास होणार आहे.