३४ लाखांच्या दारूवर पोलिसांनी फिरविला रोडरोलर
By दिगांबर जवादे | Updated: December 28, 2023 19:47 IST2023-12-28T19:47:29+5:302023-12-28T19:47:51+5:30
देसाईगंज व आष्टी ठाण्यांतर्गत कारवाई.

३४ लाखांच्या दारूवर पोलिसांनी फिरविला रोडरोलर
गडचिरोली: आष्टी व देसाईगंज पोलिसांनी विविध कारवायांमध्ये जप्त केलेली सुमारे ३४ लाख रुपये किमतीची दारू न्यायालयाच्या परवानगीनंतर रोडरोलर चालवून नष्ट करण्यात आली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असल्याने जिल्ह्यात दारूची निर्मिती, वाहतूक व विक्रीवर बंदी आहे. त्यामुळे नजीकच्या चंद्रपूर जिल्ह्यातून दारू आणली जाते. देसाईगंज व आष्टी पोलिस ठाण्यांतर्गतची गावे चंद्रपूर जिल्ह्याला लागून आहेत. वैनगंगा नदी पार करून दारू गडचिरोली जिल्ह्यात आणली जाते. मात्र, पोलिसांकडून ते सुटू शकत नाही. कारवाई करून पोलिस दारू पकडतात. पुढे ही दारू न्यायालयाच्या निर्देशापर्यंत गोदामातच ठेवावी लागते. न्यायालयाने परवानगी दिल्यानंतरच दारू नष्ट करता येते.
आष्टी पोलिसांनी २०१६ ते २०२१ या पाच वर्षांच्या कालावधीत सुमारे १८ लाख रुपयांची देशी व विदेशी दारू जप्त केली. चामोर्शीचे न्यायदंडाधिकारी यांच्या आदेशान्वये व उत्पादन शुल्क विभाग गडचिरोली यांच्या परवानगीने आष्टी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक कुंदन गावडे यांच्या उपस्थितीत दारू साठा नष्ट करण्यात आला. देसाईगंज पोलिसांनी महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये १६७ कारवाया करीत १६ लाखांची दारू जप्त केली होती. सदर दारू नष्ट करण्यात आली. रोडरोलर चालवून दारूच्या बॉटल फोडल्यानंतर बॉटलचा चुरा खोदलेल्या खड्ड्यात टाकण्यात आला. यावेळी देसाईगंज पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी किरण रासकर, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सहकारी विभागाचे अधिकारी उपस्थित होते.