आश्रमशाळेतील दुरवस्थेचे ३३ विद्यार्थी बळी

By Admin | Updated: October 9, 2015 01:53 IST2015-10-09T01:53:51+5:302015-10-09T01:53:51+5:30

आश्रमशाळेच्या परिसरात असलेली अस्वच्छता, पावसाळ्याच्या दिवसात होणारा मलेरिया, डायरिया, डेंग्यू आदी साथीच्या रोगांचा प्रकोप ...

33 students from the ashram school | आश्रमशाळेतील दुरवस्थेचे ३३ विद्यार्थी बळी

आश्रमशाळेतील दुरवस्थेचे ३३ विद्यार्थी बळी

पाच वर्षांतील परिस्थिती : गडचिरोली व अहेरी प्रकल्पात सोयीसुविधा पुरविणे अत्यंत गरजेचे
गडचिरोली : आश्रमशाळेच्या परिसरात असलेली अस्वच्छता, पावसाळ्याच्या दिवसात होणारा मलेरिया, डायरिया, डेंग्यू आदी साथीच्या रोगांचा प्रकोप तसेच सर्पदंश यासारख्या अनेक कारणांमुळे मागील पाच वर्षांत गडचिरोली व अहेरी प्रकल्पातील सुमारे ३३ विद्यार्थ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. ही सर्व परिस्थिती आश्रमशाळांमधील दुरवस्थेमुळे निर्माण झाली आहे.
आदिवासी विद्यार्थ्यांना अध्ययनासह भोजनाची व निवासाची व्यवस्था व्हावी. यासाठी शासनाने आदिवासी बहूल भागामध्ये आश्रमशाळा स्थापन केल्या आहेत. गडचिरोली प्रकल्पात २८ शासकीय, १९ अनुदानित अशा एकूण ४७ आश्रमशाळा आहेत. अहेरी प्रकल्पात ११ शासकीय, १४ अनुदानित, भामरागड प्रकल्पात आठ शासकीय, १३ अनुदानित आश्रमशाळा आहेत. तिन्ही प्रकल्पांतर्गत शासकीय व अनुदानित अशा एकूण ९३ आश्रमशाळा चालविल्या जातात.
आश्रमशाळांमध्ये शिक्षणासह निवासाची सोय आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी लागणाऱ्या दैनंदिन वस्तूसुध्दा उपलब्ध करून दिल्या जात होत्या. त्यामुळे १० वर्षांच्या पूर्वी आश्रमशाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या उड्या पडत होत्या. मात्र कालांतराने शासनाचे व संस्था प्रमुखांचे आश्रमशाळांच्या दर्जाकडे, इमारतीकडे दुर्लक्ष झाले. मागील २० वर्षांपासून इमारतींची दुरूस्ती करण्यात आली नाही. परिणामी खिडक्यांची तावदाने फुटली आहेत. पावसाळ्याच्या दिवसात छतांमधून पावसाचे पाणी गळते. बेड तुटले असल्याने विद्यार्थ्यांना खालीच झोपावे लागते. आश्रमशाळेच्या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. राहण्याच्या ठिकाणीही स्वच्छता पाळली जात नाही. विद्यार्थ्यांना देण्यात येणारे जेवन अत्यंत निकृष्ठ दर्जाचे राहते. या सर्व बाबींचा शिकार आश्रमशाळेतील विद्यार्थी बनत चालले आहेत. मागील पाच वर्षांत विविध कारणांमुळे सुमारे ३३ विद्यार्थ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. गडचिरोली प्रकल्पांतर्गत येणाऱ्या शासकीय आश्रमशाळेत २००९-१० या वर्षात तीन, २०११-१२ मध्ये एक, २०१२-१३ मध्ये तीन, २०१३-१४ मध्ये पाच, २०१४-१५ मध्ये दोन, २०१५-१६ मध्ये एक अशा एकूण १५ विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागला आहे. अनुदानित आश्रमशाळेतील २०११-१२ मध्ये दोन, २०१४-१५ मध्ये दोन, २०१५-१६ मध्ये दोन, असे एकूण सहा विद्यार्थी मृत्यूमुखी पडले आहेत. अहेरी प्रकल्पातील अनुदानित शासकीयमधील २०१० ते २०१५ या कालावधीत सहा विद्यार्थी तर अनुदानित आश्रमशाळेमधील याच कालावधीत सहा विद्यार्थी असे एकूण १२ विद्यार्थी मृत्यूमुखी पडले असल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: 33 students from the ashram school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.