३१ ग्रामपंचायतीची निवड
By Admin | Updated: October 5, 2014 23:04 IST2014-10-05T23:04:05+5:302014-10-05T23:04:05+5:30
वार्षिक कृती आराखड्यासाठी निवडलेल्या ज्या ग्रामपंचायतीमध्ये किमान शौचालय नसलेली १०० कुटुंब नसतील, अशा जिल्ह्यातील ३१ ग्रामपंचायतीची निवड राष्ट्रीय स्वच्छता अभियानासाठी

३१ ग्रामपंचायतीची निवड
वार्षिक कृती आराखडा : ग्रामीण भागामध्ये स्वच्छतेवर प्रशासनाचा भर
गडचिरोली : वार्षिक कृती आराखड्यासाठी निवडलेल्या ज्या ग्रामपंचायतीमध्ये किमान शौचालय नसलेली १०० कुटुंब नसतील, अशा जिल्ह्यातील ३१ ग्रामपंचायतीची निवड राष्ट्रीय स्वच्छता अभियानासाठी करण्यात आलेली आहे. या अभियानातून ग्रामीण भागात स्वच्छतेवर भर देण्याचा प्रयत्न प्रशासनाने चालविलेला आहे.
केंद्र शासनाच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या स्वच्छ भारत मिशन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामीण भागामध्ये स्वच्छतेवर आधारित राष्ट्रीय कार्यक्रमाला बळकटी देण्याकरिता २३ आॅक्टोबरपर्यंत राज्यभरात राष्ट्रीय स्वच्छता अभियान या नावाने जनसंवाद माध्यमातून जनजागृती अभियान राबविण्यात येणार आहे. हे अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हास्तरीय बैठक पार पडली असल्याची माहिती मिळाली आहे. सदर अभियान यशस्वी करण्यासाठी अंगणवाडी सेविका, निर्मल दुत, रोजगार सेवक, जलसुरक्षा तसेच परिसर यांचे सहकार्य घेतले जाणार आहे. या अभियानादरम्यान ग्रामीण भागातील कुटुंबांना भेटी देऊन ग्रामस्थांना शौचालय बांधणे व त्याचा वापर करणे, शाळांमध्ये मुला, मुलींसाठी स्वच्छतागृहाची उपलब्धता, हात धुण्याचे महत्व, सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन व परिसर स्वच्छता, लहान मुलांच्या विष्ठेचे व्यवस्थापन, पिण्याच्या पाण्याची सुरक्षित हाताळणी व साठा आदीबाबत संदेश पोहोचविण्यासाठी तसेच ग्रामस्थांचे प्रबोधन करण्यासाठी अधिकाधिक गृहभेटी करण्यावर जिल्हा परिषद प्रशासनाने भर दिला आहे. तालुकास्तरावरील कर्मचाऱ्यांना निर्देश देण्यात आले असून ग्रामस्तरावर सदर अभियान यशस्वी करण्याचे आवाहन जि. प. प्रशासनाने केले आहे.
वार्षिक कृती आराखड्यात निवड करण्यात आलेल्या ३१ ग्रामपंचायतीमध्ये कोरची तालुक्यातील सातपुती, बेतकाठी, बेडगाव, कुरखेडा तालुक्यातील पलसगड, बेलगाव, अंगारा, आरमोरी तालुक्यातील वैरागड, देऊळगाव, देसाईगंज तालुक्यातील एकलपूर, आमगाव, गडचिरोली तालुक्यातील अडपल्ली, गोगाव, मुडझा, काटली आदी गावांचा समावेश आहे. देसाईगंज तालुक्यातील कोरेगाव, पोटगाव, विहिरगाव, सावंगी, कुरूड, तुळशी, शंकरपूर, कोकडी, बोडधा तसेच धानोरा तालुक्यातील लेका, मुलचेरा तालुक्यातील लगाम, एटापल्ली तालुक्यातील जांभिया, अहेरी तालुक्यातील महागाव खुर्द व सिरोंचा तालुक्यातील वडधम, डोंगरगाव, विसोरा आदी गावांचा समावेश आहे.
विशेष अभियानांतर्गत दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांना वयक्तीक शौचालय बांधकामासाठी जिल्ह्यातील ३२ ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली आहे. यामध्ये कोरची तालुक्यातील बेलगाव घाट, कोसमी क्र. २, नांगपूर, कुरखेडा तालुक्यातील शिवणी, घाटी, चिरचाडी, कढोली, खेडेगाव, नरचुली, कासवी, गडचिरोली तालुक्यातील विहीरगाव, चुरचुरा, वसा, मुरखळा व कोटगल आदी ग्रामपंचायतीचा समावेश आहे. धानोरा तालुक्यातील कारवाफा, मिचगाव बुज, दराची, सुंदरनगर, गोमणी, चामोर्शी तालुक्यातील हळदवाही, आष्टी, दुर्गापूर, गिलगाव, सोनापूर, एटापल्ली तालुक्यातील गुरूपल्ली, वाघेझरी आदी ग्रामपंचायतीचा तसेच अहेरी तालुक्यातील नागेपल्ली, वेलगुर, देवलमरी, बोरी व सिरोंचा तालुक्यातील विठ्ठलराव पेठा या एकमेव ग्रामपंचायतीचा समावेश आहे. या ग्रामपंचायतीच्या गावात शौचालयाची निर्मिती होणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)