३०० सिकलसेल रुग्णांची तपासणी
By Admin | Updated: June 22, 2015 01:34 IST2015-06-22T01:34:20+5:302015-06-22T01:34:20+5:30
अहेरी उपजिल्हा रुग्णालयातील आयसीटीसी विभागाच्या मार्फतीने जागतिक सिकलसेल दिन साजरा झाला.

३०० सिकलसेल रुग्णांची तपासणी
अहेरी/कुरखेडा : जागतिक सिकलसेल दिनाचे औचित्य साधून उपजिल्हा रुग्णालय अहेरी व कुरखेडाच्या वतीने सिकलसेल रुग्णांची तपासणी करण्यात आली.
अहेरी उपजिल्हा रुग्णालयातील आयसीटीसी विभागाच्या मार्फतीने जागतिक सिकलसेल दिन साजरा झाला. यावेळी ३०० नागरिकांची सिकलसेल तपासणी करण्यात आली. त्यामध्ये २० रुग्णांना सिकलसेल असल्याचे दिसून आले. या सर्व रुग्णांना मार्गदर्शन करून औषधोपचार केला जाणार आहे. मार्गदर्शन करताना सिकलसेल समुपदेशक संजय उमडवार यांनी सिकलसेल आजाराची माहिती दिली. सिकलसेल वाहक व रुग्ण यांनी घ्यावयाची काळजी, विवाहपूर्व सिकलसेल आजाराची तपासणी करून भावी पिढीला होणारा संभाव्य धोका टाळण्यात यावा, असे आवाहन केले. रुग्णांना सिकलसेल ओळखपत्र बनवून विविध शासकीय योजनांचा फायदा घ्यावा. पावसाळ्याला सुरुवात झाली असल्याने निरोगी आरोग्यासाठी मच्छरदाणीचा वापर करावा, पाणी उकळून घ्यावे, असे मार्गदर्शन केले. संचालन सिकलसेल तंत्रज्ञ संदीप डेकाटे यांनी केले. यशस्वीतेसाठी आयसीटीसी तंत्रज्ञ दिकोंडा, टीबी तंत्रज्ञ पडको, आरोग्यधाम संस्थेचे स्वयंसेवक प्रवीण दुर्गे उपस्थित होते.
कुरखेडा उपजिल्हा रुग्णालय व आरोग्यधाम स्वयंसेवी संस्था यांच्या वतीने जागतिक सिकलसेल दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी रुग्णांची तपासणी करून त्यांना एसबीडीसी, लाल, पिवळे कार्ड देण्यात आले. तसेच हेल्थ फाईलचे वितरण करण्यात आले. यावेळी सिकसेल तज्ज्ञ प्रियंका लभाने, तालुका पर्यवेक्षक विजय सोनटक्के यांनी सिकलसेल आजार व संजय गांधी योजनेबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला डॉ. रमेश कटरे, वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ एच. के. मैंद लॅब तंत्रज्ञ कल्पना भट, लक्ष्मी मोगरे, पंडीत पवार, सतिश राणे, शामल कांबळे, संजय वालदे, प्रशील नंदेश्वर यांच्यासह उपजिल्हा रुग्णालयाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)