३० हजार क्विंटल बियाणे लागणार
By Admin | Updated: May 17, 2015 02:09 IST2015-05-17T02:09:52+5:302015-05-17T02:09:52+5:30
चालू खरीप हंगामात सुमारे दोन लाख हेक्टर क्षेत्रावर पिकांची लागवड करण्याचे नियोजन कृषी विभागाने केले असून एवढ्या क्षेत्रासाठी २९ हजार ...

३० हजार क्विंटल बियाणे लागणार
गडचिरोली : चालू खरीप हंगामात सुमारे दोन लाख हेक्टर क्षेत्रावर पिकांची लागवड करण्याचे नियोजन कृषी विभागाने केले असून एवढ्या क्षेत्रासाठी २९ हजार ७११ क्विंटल बियाणे व ४९ हजार ८०० मेट्रिक टन रासायनिक खताची गरज भासणार आहे. त्यादृष्टीने कृषी विभागाने तयारी केली असून काही प्रमाणात बियाणे व रासायनिक खत उपलब्ध झाले आहे.
खरीप हंगामात सर्वाधिक पिकांची लागवड केली जात असल्याने कृषी विभागाच्या मार्फतीने या हंगामासाठी विशेष तयारी केली जाते. शेतकऱ्यांना वेळेवर बियाणे, खते, किटक नाशके उपलब्ध होतील. याबाबतचे उन्हाळ्यातच नियोजन केले जाते. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या गरजेचा व अज्ञानाचा गैरफायदा घेऊन खते व बियाणांचा काळा बाजार होणार नाही, याकडे विशेष लक्ष दिले जाते.
चालू खरीप हंगामात सुमारे दोन लाख हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांची लागवड करण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. यामध्ये सर्वाधिक क्षेत्र धान पिकाचे असून सुमारे एक लाख ७६ हजार हेक्टर क्षेत्रावर धान पिकाची लागवड केली जाणार आहे. तीन हजार ७३० हेक्टरवर सोयाबिन, सात हजार ९०० हेक्टरवर तूर, सात हजार ७०० हेक्टरवर कापूस, एक हजार २०० हेक्टरवर मका, ५३८ हेक्टरवर तिळाचे उत्पादन घेतले जाणार आहे.
कृषी विभागाच्या मार्गदर्शनानंतर शेतकरी संकरित बियाणांचा वापर करू लागला आहे. शेतीच्या दृष्टीने बियाणे हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे बियाणे वेळेवर व चांगल्या दर्जाचे उपलब्ध होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. बियाणे खराब निघाल्यास शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान होण्याबरोबरच संपूर्ण फसल मार खाण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे शेतकऱ्यांसह कृषी विभागही बियाणांच्या बाबतीत संवेदनशील असल्याचे दिसून येते. गडचिरोली जिल्ह्याला सुमारे २९ हजार ७११ क्विंटल बियाणे लागणार आहे. यामध्ये महाबिज १७ हजार ५४ क्विंटल बियाणे उपलब्ध करून देणार आहे. तर खासगी कंपन्यांच्या मार्फतीने १२ हजार ६५७ क्विंटल बियाणे उपलब्ध होणार आहेत.
एक महिन्यानंतर प्रत्यक्ष पेरणीला सुरूवात होणार आहे. शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळू लागले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खते व बी-बियाणांची खरेदी सुरू केली आहे. जवळपास पाच हजार क्विंटल बियाणे कृषी केंद्र चालकांकडे उपलब्ध झाले आहेत. (नगर प्रतिनिधी)
१३ भरारी पथकांची निर्मिती
शेतकऱ्यांच्या अज्ञान व गरजेचा गैरफायदा घेऊन कधीकधी कृषी केंद्र चालक व व्यापाऱ्यांकडून बियाणे व खतांचा कुत्रिम तुटवडा निर्माण केला जातो व शेतकऱ्यांची लुबाडनुक केली जाते. या प्रकाराला आळा घालण्यासाठी कृषी विभागाने प्रत्येक तालुक्यात एक या प्रमाणे तालुकास्तरावर १२ व जिल्हास्तरावर एक पथकाची नेमणूक केली आहे.
कृषी निवेष्ठांच्या तक्रारीचे वेळीच निराकरण करण्यासाठी १३ तक्रार निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षाची फार मोठी मदत होईल.
घरचे बियाणे वापरण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन
कृषी केंद्रातून खरेदी केलेले बियाणे महाग असल्याने प्रत्येक शेतकऱ्याला ते खरेदी करणे शक्य होत नाही. परिणामी काही शेतकरी घरचे धान्य बियाणे म्हणून वापरतात. घरचे बियाणे वापरताना ते निरोगी व चांगले असावे, याबाबत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन केले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचे पैसे वाचण्यास मदत होणार आहे.